महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून दिवाळीनंतर प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. प्रचारासाठी ८ दिवसाहून कमी कालावधी शिल्लक राहिला असून उमेदवारांकडून गावे, वाड्या-वस्त्या पिंजून काढल्या जात आहेत. दुर्गम भागातील मतदारांच्याही गाठीभेटी घेतल्या जात आहेत. राज्यात शेजारी-शेजारी असणारी दोन गावे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात असल्याचे नवे नाही. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात एक गाव असं आहे ज्यातील नागरिकांचं मतदान दोन विधानसभा मतदारसंघात आहे.
या गावात दोन मतदारसंघातील लोकांच्या मतदार याद्या वेगवेगळ्या असतात तसेच मतदान केंद्रेही वेगळी असतात. दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जेव्हा प्रचारासाठी गावात येतात तेव्हा आपला मतदार कोण यामुळे संभ्रमात पडत आहेत. सोयगाव तालुक्यात निमखेडी विहिरे तिखी ग्रुप ग्रामपंचायत आहे. हे गाव सिल्लोड आणि कन्नड अशा दोन विधानसभा मतदारसंघात विभागलं आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सिल्लोड आणि कन्नड असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. तर लोकसभेसाठी जालना आणि औरंगाबाद मतदारसंघात हा तालुका विभागला गेला आहे. याच मतदारसंघात असलेल्या ग्रुप ग्रामपंचायतीत उमर विहिरे गावातील ९७२ मतदारांपैकी व़ॉर्ड क्रमांक ३ हा सिल्लोड मतदारसंघात तर वॉर्ड क्रमांक एक आणि दोन हा कन्नड मतदारसंघात आहे.
या गावातील ग्रुप ग्रामपंचायतीतील तिखी गाव वॉर्ड क्रमांक ३ मध्ये येतं. या वॉर्डातील लोक सिल्लोड मतदारसंघात मतदान करतात. तर निमखेडी वॉर्ड क्रमांक एक आणि विहिरेतील मतदार कन्नड मतदारसंघात मतदान करतात. यामुळे गावाला दोन आमदार, दोन खासदार असल्याचं चित्र आहे.
ग्रुप ग्रामपंचायतीची विभागणी कन्नड आणि सिल्लोड या दोन मतदारसंघात झाली आहे. या गावातल्या तिन्ही प्रभागात वेगवेगळ्या ठिकाणी तीन मतदान केंद्रे आहेत. त्यात एक मतदान केंद्र सिल्लोडसाठी तर दोन मतदान केंद्र कन्नड मतदारसंघासाठी आहेत. गावात प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांचीसुद्धा आपला मतदार कोण हे शोधण्यात चांगलीच पंचाईत होते. स्थानिक ग्रामस्थ सोबत असल्याशिवाय त्यांना आपल्या मतदारांपर्यंत पोहोचताच येत नाही.