Sport Complex Scam : छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी कर्मचाऱ्यांनीतब्बल२२ कोटींचा घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिन्याला १३ हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या मदतीने क्रीडा संकुलात कोट्यवधींचा घोटाळा केला.दोन कर्मचाऱ्यांनी क्रीडा संकुलात २१ कोटी ५९ लाख ३८ हजारांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं राज्यभरात खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात काम करणाऱ्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर, यशोदा शेट्टी आणि तिचा पती बीके जीवन या तिघांनी २१ कोटी ५९ लाख ३८ हजारांचा घोटाळा केला आहे.या घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागर सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
विभागीय क्रीडा संकुलात २१ कोटी ५९ लाखांचा घोटाळा करणाऱ्या मुख्य आरोपी हर्ष क्षीरसागर (वय २३) याला १३ हजार रुपये पगार आहे. मात्र त्याने नुकतीच स्वतःसाठी एक बीएमडब्ल्यू कार, अन् बीएमड्ब्यू बाईक खरेदी केली. तर गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी विमानतळासमोरील आलिशान एरियात ४ बीएचके लक्झरी फ्लॅट गिफ्ट केला.
त्याच बरोबर शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवायला टाकला होता. तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने ३५लाखांची एसयुव्ही कार खरेदी केली आहे, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेमध्ये असलेल्या खात्यात राज्य सरकारकडून क्रीडा संकुलासाठी प्राप्त होणारा निधी जमा होतो. या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीने धनादेशाद्वारे केला जातो. मात्र विभागीय संकुलातील कंत्राटी कर्मचारी असलेले आरोपी हर्षकुमार क्षीरसागर, यशोदा शेट्टी आणि तिचा नवरा बीके जीवन यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बँकेला दिली आणि स्वतःचा नंबर बँकेत देऊन इंटरनेट बँकिंग ऍक्टिव्हेट करून घेतले. इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली. विशेष म्हणजे, हा प्रकार विभागीय उपसंचालकाच्या ६ महिन्यानंतर लक्षात आला.
बुकमध्ये नोंदी, पावती बुक लिहिणे, बँकेची पत्रव्यवहार करणे असे काम क्षीरसागर आणि शेट्टी करत होते. क्षीरसागरने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेस बनावट मजकुराचे पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू करून घेत पैसे ट्रान्स्फर केले. आतापर्यंत क्षीरसागर, शेट्टी यांच्या खात्यात ५९ कोटी आले.
२०२३पासून म्हणजे एका वर्षात त्यांच्या खात्यात जवळपास ५९ कोटी सात लाख ८२ हजार रुपयांची रक्कम आली होती. त्यामधून कोट्यावधी रुपये त्यांनी वळते केले. अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली. मात्र या घोटाळ्याची कुणकुण क्रीडा संकुलाच्या प्रशासनाला कशी लागली नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
संबंधित बातम्या