Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छत्रपती संभाजीनगरमधून एका भीषण अपघाताचे वृत्त समोर आले आहे. संभाजीनगरमधील बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर हायवा ट्रक व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन भावंडांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत असलेले तिघेही बहिण-भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे. हे तिघे परीक्षेसाठी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृत बहीण भावाची नावं आहेत. तिघेही २० ते २५ वयोगटातील आहेत. अपघाताची माहिती मिळतात पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. तिघेही परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती असून गेल्या काही दिवसांपासून ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते.
बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दोन भरधाव ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याची स्पर्धा लागली होती, त्यातूनच हा अपघात झाला व तीन बहीण-भावांना आपल्या जीवाला मुकावे लागले. मृतांजवळ वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट सापडले. त्यावर आजच परीक्षेचा दिनांक होता. यावरून हे तिघे परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
पोलिसांकडून मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून गाडीसह फरार झाला असून पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेत आहेत. तिनही मृतदेह घाटी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या