Sambhaji Nagar : ‘या’ प्रकरणाला वैतागून सरपंचाने पंचायत समितीसमोरच उधळले लाखो रुपये; पाहा VIDEO
Sarpanch squandered lakhs of rupees : फुलंब्री पंचायत समितीवर एका सरपंचाने वैतागून पैसे उधळून अनोखे आंदोलन केले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
देशात भ्रष्टाराची अनेक प्रकरणे उघडकीस येत असतात, तसेच या गंभीर समस्येचा गांधीगिरी मार्गाने विरोध व निषेध केल्याचेही प्रकार अनेकदा घडत असतात. असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीवर एका सरपंचाने वैतागून पैसे उधळून अनोखे आंदोलन केले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
शेतकऱ्यांना विहिरी वअन्य योजनांची प्रकरणे मंजूर करण्यासाठी गटविकास आधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप करत तरुण सरपंचाने हे कृत्य केले आहे. त्यांनी पैसे उधळत म्हटले की, सध्या इतके पैसे घ्या आणि कमी पडले तर आणखी भीक मागून पैसे गोळा करून आणून देतो.
हा प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीसमोर घडला. मंगेश साबळे असे अनोखे आंदोलन करणाऱ्या सरपंचाचे नाव आहे. ते फलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच असून अपक्ष आहेत. त्यांनी फुलंब्रीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत पंचायत समितीच्या आवारात तब्बल दोन लाखांची रक्कम उधळली.
या आंदोलनाबाबत साबळे म्हणाले की, मी शेतकऱ्यांकडून हे पैसे जमा केले आहेत. दोन लाखांची ही रक्कम असून हे पैसे आम्ही फुलंब्री पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मॅडम यांना देत आहे. त्यांना आमचे सांगणे आहे की, हे पैसे घ्या मात्र आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांचा विहिरी व अन्य प्रकरणे मंजूर करा. हे पैसे कमी पडले तर आणखी आणून देतो, असेही साबळेंनी सांगितले.
विहिरी मंजूर केल्या नाही तर लाचलुचपत विभागाच्या अधीक्षक कार्यालयाबाहेर आम्ही भीक मागू. शेतकऱ्यांसह तेथे आंदोलन करू. असा इशारा त्यांनी दिला आहे.
साबळे म्हणाले की, बारमध्ये नाचणाऱ्यांवर पैसे फेकले जातात तोकाळा पैसा असतो. हा पैसा मात्र शेतकऱ्यांच्या कष्टाचा आहे. शेतकऱ्यांचा घामाचा आहे. मात्र हक्काच्या कामासाठी अधिकाऱ्यांना हजारो रुपयांची लाच द्यावी लागत आहे. दीड लाख रुपये पगारअसणारे अधिकारी लाच मागत आहेत. त्यांना पेन्शनही पाहिजे.