मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ८ महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून निर्दयी आई पसार, घाटी रुग्णालयातील प्रकार

८ महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून निर्दयी आई पसार, घाटी रुग्णालयातील प्रकार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 03, 2024 10:51 PM IST

Chhatrapati Sambhaji Nagar : बाहेरून औषध आणायला जायचं असल्याचं सांगून एका महिलेने आपले ८ महिन्यांचे बाळ दुसऱ्या महिलेकडे सोपवले व ती पसार झाली. ही घटना संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात घडली.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

आपल्या ८ महिन्याच्या बाळाला दुसऱ्या महिलेच्या स्वाधीन करून एका निर्दयी आईने पोबारा केला आहे. आईच्या नात्याला काळिमा फासण्याच्या प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात समोर आला आहे. एका आईने तिच्या आठ महिन्यांच्या बाळाला दुसऱ्या औषध आणण्याचा बहाणा करून दुसऱ्या का महिलेच्या हातात सोपवून पळ काढला. आपल्या चिमुकल्याला रुग्णालयात सोडून जाणाऱ्या महिलेच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

बाहेरून औषध आणायला जायचं असल्याचं सांगून एका महिलेने आपले ८ महिन्यांचे बाळ दुसऱ्या महिलेकडे सोपवले. बराच वेळ झाला तरी बाळाची आई न आल्याने महिलेने याची माहिती रुग्णालय कर्मचाऱ्यांना दिली. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. बाळाला घाटीतील बालरोग विभागात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी रात्रीच्या सुमारास घाटी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २७ जवळ चेहऱ्याला स्कार्फ बांधलेल्या महिलेने बाहेरून लगेच औषध घेऊन येतो म्हणत आपले बाळ तिच्या जवळ बसलेल्या महिलेकडे सोपवले.औषध घेऊन लगेच येतो असे सांगत ती महिला रुग्णालयातून पसार झाली. बराच वेळ होऊनही ती येत नसल्याने महिलेने शोधाशोध केली. पण ती कुठे आढळून आली नाही. अखेर या महिलेने आणि इतरांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालय गाठले आणि झालेला प्रकार निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितला.

रुग्णालय प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पाहिले असता ही महिला बाळाला सोडून पसार होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी घाटी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर, महिलेने तिच्या बाळाला असे सोडून का दिले, याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाहीये. पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेचा शोध घेत आहेत.

WhatsApp channel