Sambhajinagar SAhil Nandedkar Suicide : संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यांन आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. मात्र, त्याने आदल्या दिवशी वडिलांशी संवाद साधला. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याने गळफास घेतला असल्याचं आढळलं. त्यांन त्याच्या खोलीतील आरशात, मी जीवनाचा आनंद घेतला आहे, मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे, लव्ह यू बोथ असे लिहून ठेवले आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल शीलवंत नांदेडकर (वय १७) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. १२ ऑक्टोबरला नांदेडकर कुटुंबीयांनी एकत्र दसरा साजरा केला.
यावेळी साहिलही या उत्सवात हिरीहीरीने सहभागी झाला होता. तो आनंदी होता. त्याने रात्री उशिरापर्यंत आई-वडिलांसोबत गप्पा देखील मारल्या. त्यानंतर सर्वजण झोपल्यावर त्याने गळफास घेऊन खोलीतच जीवन संपवलं.
दरम्यान, नांदेडकर हे सकाळी ६ वाजता वॉकिंगला जाण्यासाठी उठले. तेव्हा साहिल झोपेतून उठला नसल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी साहिलला उठवण्यासाठी त्याला आवाज दिला. मात्र, त्याच्या खोलीतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी साहिलच्या खोलीचा दरवाजा जोरदार वाजवला. त्यांनी साहिलच्या बाजूच्या खिडकीतून पाहिले असता त्याने गळफास घेतल्या आढळले.
साहिलला असे पाहून ते हादरले. त्यांनी तातडीने घरातील सर्वांना उठवले. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहिलने आत्महत्या का केली हे याचे कारण पुढे आलेले नाही. या घटनेमुळे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.