बहीण-भावाच्याअतुट प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधन सण आज संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. मात्र याच वेळी छत्रपती संभाजीनगरमधून मन हेलावणारी घटना समोर आली आहे. रक्षाबंधनादिवशीच एका बहिणीने आपल्या भावाला गमावले आहे. राखी बांधून घेण्यासाठी बहिणीच्या घरी आलेल्या भावाने आपले आयुष्य संपवले. वाळूज परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान तरुणाने हा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप बाबत समोर आलेले नाही.
आकाश सर्जेराव शिंदे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश शिंदे हा नांदेड जिल्ह्यातल्या खैरकाया गावामध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. वाळूज परिसरातील बजाजनगरातील छत्रपतीनगरमध्ये ही घटना घडली आहे. रक्षाबंधनानिमित्त आकाश छत्रपती नगरमध्ये राहणाऱ्या आपल्या बहिणीच्या घरी आला होता. याच ठिकाणी त्याने आत्महत्या केली.
‘ताई मला माफ कर’ अशी चिठ्ठी लिहून या तरुणाने बहिणीच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. आकाशने आत्महत्या का केली, याचे कारण अस्पष्ट असून यामुळे त्याच्या बहिणीसह संपूर्ण कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला. क्षाबंधनाच्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे वाळूज परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.