Sharad Pawar Meet Chhagan Bhujbal : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आज शरद पवारांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि माजी मंत्री भुजबळ हे दोन्ही नेते एकाच मंचावर आले. त्यावेळी भुजबळ आणि शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केला व छगन भुजबळ शरद पवारांच्या पाया देखील पडले.
दोन्ही नेत्यांमध्ये माजी आमदार राम कांडगे यांच्या घरी बराच वेळ चर्चा देखील झाली. भुजबळ आणि शरद पवार यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर छगन भुजबळ दुसऱ्यांदा शरद पवारांना भेटले,या आधी सिल्व्हर ओकवर जाऊन त्यांनी पवारांची भेट घेतली होती, त्यानंतर आज त्यांची चाकणमध्ये भेट झाली.
कार्यक्रमात भाषण करताना छगन भुजबळ म्हमाले की,मी आणि पवार साहेब एकाच मंचावर येणार असल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. पण मी तुम्हाला सांगतो, महात्मा फुले,सावित्रिबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांसंदर्भातील कुठलाही कार्यक्रम कुठेही असेल तर पवारसाहेब त्या कार्यक्रमाला जाणार, मला वेळ असेल तर मी जाणार आणि काही कार्यक्रमांना आम्ही दोघेही जाणार. त्यातून राजकीय चिंता करण्याची किंवा वेगळे अर्थ काढण्याची काहीही आवश्यकता नाही.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. यावर छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केलं आहे. भुजबळ म्हणाले की, भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे, हे बरोबर आहे, पण महात्मा गांधी, महात्मा फुले... महात्मा मोठं की भारतरत्न मोठं? भारतरत्न किती आहेत, हे सांगता येणार नाही, पण महात्मा किती आहेत?
स्वत: महात्मा गांधी यांनी सांगितलं की, ज्योतीराव फुले हेच खरे महात्मा आहेत. महात्मा गांधी, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर...असे दोन-तीनच महात्मा आहेत. भारतरत्न दिल्यास भारतरत्न महात्मा जोतिराव फुले असा नामोल्लेख करायचा का?जोतिराव फुले यांची महात्मा ही मोठी पदवी आहे. हे माझे मत आहे, असे भुजबळ म्हणाले.
संबंधित बातम्या