Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पक्षात डावललं जात असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असून लवकरच ते घरवापसी करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यातच छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीत नाराज असल्याचे वृत्त फेटाळून लावताना आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही नेत्याशी आपला संपर्क झाला नसल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
‘मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत व नंतरही मी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार आहे’,असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. विधानसभेआधी अथवा नंतर मी कुठेही जाणार नाही. मी दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. भुजबळ म्हणाले की, मी पक्षात नाराज नाही, तसेच कोणत्या अन्य पक्षातील नेत्यांना भेटलो नाही. माझ्या नाराजीच्या चर्चा फक्त प्रसारमाध्यमांनीच सुरु केल्या आहेत, ज्या साफ खोट्या आहेत.
तुम्ही नाराजीच्या चर्चा करणार असाल तर मी काय करणार आहे. मी कुणालाही भेटलो नाही.१० तारखेपासून मी कार्यक्रमात व्यस्त आहे. कोणालाही भेटायला मला वेळ नाही. मला जर कुठे जायचं असेल तर ओपनली भेटेन. राजकारणामध्ये प्रत्येक जण नाराज होत असतो. मात्र त्याने काम होत नाही, दुसऱ्या दिवशी कामाला लागायचं असतं. राहुल गांधी सुद्धा नाराज झाले असतील,त्यांना बहुमत मिळालं नाही. पण ते आता कामाला लागले आहेत.
पवार साहेब सुद्धा नाराज असतील, सक्षम असून पंतप्रधान होऊ शकलो नाही. कमी जागा आल्या म्हणून फडणवीस सुद्धा नाराज असतील. अजित पवार सुद्धा नाराज असतील,त्यांच्याही जागा कमी आल्या आहेत. पण ही सगळी लोक नाराज झाली आहेत,पण दुसऱ्या दिवशी कामाला लागले होते. मी सुद्धा कुठेही नाराज नाही,असं भुजबळ म्हणाले.
संबंधित बातम्या