मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर; राज्यात नव्या राजकीय समीकरणांची मांडणी

Maharashtra Politics : छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर; राज्यात नव्या राजकीय समीकरणांची मांडणी

Feb 02, 2024 10:53 AM IST

Anjali Damania on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

Chhagan Bhujbal May Join BJP
Chhagan Bhujbal May Join BJP (Hindustan Times)

Chhagan Bhujbal May join BJP : राज्याच्या राजकारणातून पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा दावा केला आहे.

राज्यातील सध्याच्या बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं आहे. सोशल मीडियात पोस्ट करून दमानिया यांनी हा दावा केला आहे. ‘एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप,’ असा सवाल दमानिया यांनी केला आहे.

या संदर्भात त्यांनी वृत्तवाहिन्यांकडं सविस्तर भूमिकाही मांडली. 'भारतीय जनता पक्षाला येत्या लोकसभा निवडणुकीत ४०० च्या वर खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी त्यांना जिथून कुठून मतं मिळतील ती हवीच आहेत. मग ती दोन-तीन टक्के का असेनात. त्यासाठी भाजप कुठल्याही स्तराला जाऊ शकतो, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई काँग्रेसला मोठा धक्का, सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात करणार प्रवेश!

मराठा - ओबीसी वादामुळं भुजबळ यांना भाजपमध्ये घेतलं जातंय का यावर दमानिया यांनी मत मांडलं. 'मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद हा समाजातील वाद नाही. हा राजकारण्यांनी उभा केलेला वाद आहे. मराठे आणि ओबीसी आपसात लढणार नाही. त्यांना लढवलं जातंय. त्यासाठी छगन भुजबळ यांच्यासारखे राजकारणातून संपलेल्या नेत्यांना पुन्हा उभं केलं जातंय, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. दुसरीकडं एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांना साथ देताना दिसत आहेत. गावपातळीवरही ह्याचे परिणाम होत आहे. हे चांगलं नाही. हे थांबायला हवं, असं दमानिया म्हणाल्या.

भाजप हे करणार नाही असं वाटतं!

भाजपच्या सरकारनं छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणात तुरुंगात पाठवलं होतं. आता त्याच भुजबळ यांना आपल्या फायद्यासाठी थेट भाजपमध्ये घेतलं जात आहे. त्यांना ओबीसींचा राष्ट्रव्यापी चेहरा बनवण्याची भाजपची योजना आहे. हे भयंकर आहे. भाजपनं हे करू नये, असं अपेक्षा दमानिया यांनी व्यक्त केली.

NCP Split Verdict: राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची? १५ फेब्रुवारीला होणार निर्णय

भुजबळांचा खुलासा

अंजली दमानिया यांचा हा दावा छगन भुजबळ यांनी फेटाळून लावला आहे. 'मला भाजपच्या ऑफरबद्दल काही माहिती नाही. दमानियांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहीत नाही. मीडियानं हे त्यांनाच विचारावं, असं भुजबळ म्हणाले.

'मला कुठल्या पदाची हाव नाही. मी मंत्री आहे. माझ्या पक्षात माझं सुरळीत चाललंय. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी समाजासाठी काम करतोय. त्यामुळं आता नवीन काही नको. मला असं कुठलंही प्रपोजल आलेलं नाही, असं भुजबळ म्हणाले.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर