Chhagan Bhujbal On ED : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मंत्री छगन भुजबळ यांनी एका पुस्तकात दिलेल्या व्यक्तव्याववरून राज्यच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात ईडीच्या भीतीमुळे आम्ही भाजपसोबत गेल्याचा दावा त्यांनी केला होता. आमच्या मागे चौकशांचा ससेमीरा लावण्यात आला होता. तसेच जेलमध्ये पण डांबण्यात आले होते. या काळात आम्हाला भाजपसोबत जाण्याचा दबाव येत होता असे भुजबळ म्हणाले होते. मात्र, त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. आम्ही ईडीमुळेनाही तर विकास कामे करण्यासाठी भाजप सोबत गेल्याचं भुजबळ यांनी आता म्हटलं आहे. पुस्तकात काय लिहिले हे माहिती नाही असे देखील भुजबळ यांनी म्हटलं आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलतांना छगन भुजबळ म्हणाले, मी कोणत्याही वृत्तपत्राला कोणतीच मुलाखत दिलेली नाही. आम्ही ईडीच्या भीतीमुळे भाजपसोबत गेल्याच आरोप आमच्यावर सुरूवातीपासून होतो आहे. मला महाराष्ट्र सदन प्रकरणातून देखील न्यायालयाने क्लिनचीट दिली असतांना आम्हाला कोणत्याच चौकशीची भीती नाही. आम्ही भाजपसोबत विकासासाठी गेलो. आम्ही आमच्या मतदार संघात अनेक विकासकामे केली आहे. मात्र, हे आताच का छापण्यात आलं या बद्दल शंका आहे. राजदिप सरदेसाई यांचं पुस्तक मी अद्याप वाचले नाही. त्यामुळे त्यात काय लिहिले आहे याची माहिती नाही, त्यात अनेक नको त्या गोष्टी लिहिण्यात आल्या असून या मागे नेमका काय हेतु आहे हे माहिती नाही. त्यामुळे मी माझ्या वकिलाशी बोलून या संदर्भात निर्णय घेईन असे भुजबळ म्हणाले.
या प्रकरणी राजदिप सरदेसाई म्हणाले, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. मी पत्रकार असून राजकारण करत नाही. नागरिकांनी हे पुस्तक वाचायला हवे आहे. जी वस्तुस्थिती आहे ती मी पुस्तकात मांडली आहे. राजकारण ज्यांना करायचा ते करतील. मला मात्र, यात पडायचे नाही. छगन भुजबळ याच्यासोबत मी विविध विषयांवर बोललो आहे. त्यामुळे संपूर्ण पुस्तक वाचून यावर बोलावे असे देसाई म्हणाले. या पुस्तकाचा आणि निवडणुकाचा काही संबंध नाही, असे देखील सरदेसाई म्हणाले.