Chembur degree college bans hijab: चेंबूर येथील आचार्य मराठे महाविद्यालयाने ड्रेसकोड लागू केला आहे. या नव्या ड्रेस कोड नुसार धार्मिकता उघड होईल अशा प्रकारच्या पोशाख आणि वस्तू परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यात बुरखा, नकाब, हिजाबचाही समावेश आहे. विद्यालयाच्या या आदेशामुळे मुस्लिम मुलींनी धार्मिक आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावर व अधिकारांवर मर्यादा आणल्या जात असल्याचा आरोप केला आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात महाविद्यालयाने हा नियम लागू केला असून या नियमाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
चेंबूर येथील आचार्य मराठे महाविद्यालयात गेल्या ऑगस्ट महिन्यात ड्रेस कोड लागू केला होता. यात सर्व विद्यार्थी समान दिसावे तसेच समानतेची भावना वाढीस लागावी यासाठी त्यांनी एकसारखे कपडे घालण्यासंदर्भात ड्रेस कोड लागू केला होता. त्यानुसार महाविद्यालयांच्या आवारात मुस्लीम मुलीना हिजाब, बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली. तसेच धार्मिक गोष्टी परिधान करण्यावरही बंदी घालण्यात आली. दरम्यान, या निर्णयाला विरोध झाला होता. महाविद्यालय प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयावर मुस्लिम आणि इतर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर बुरखा काढू अशी भूमिका विद्यार्थीनींनी घेतली. महाविद्यालयाच्या गणवेश परिधान करण्याबाबत काहीच हरकत नाही. मात्र, कॉलेजच्या आतमध्ये बुरखा काढण्यास जागा उपलब्ध करुन द्यावी तिथे बुरखा काढून विद्यार्थिनी येतील अशी भूमिका यावेळी विद्यार्थीनींनी मांडली. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने आपली भूमिका ठाम ठेवली. त्याच्या परिणामी काही वेळ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या निर्णयाविरोधात मुलांनी आंदोलन केले होते. यानंतर विद्यालय प्रशासाने काही नियम शिथिल केले होते. यानंतर फॉर्मल आणि सभ्य पोशाख मुलांनी परिधान करावा असा नियम शाळा प्रशासनाने केला. ड्रेस कोड बाबत मुला मुलींना विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. मुलांनी पूर्ण बाह्याचा किंवा हाफ शर्ट आणि आणि पूल पॅन्ट घालावा. तर मुलींनी पारंपरिक पूर्ण बाह्याचा सलवार आणि कुर्ता घालण्याचा नियम केला.
कॉलेज व्यवस्थापनाने युनिफाइड ड्रेस कोडची आवश्यकता व्यक्त केली. तर या बाबत मुस्लिम विद्यार्थ्यांनी सांगितले की अशा नियमांमुळे धर्म आणि संस्कृतीच्या स्वातंत्र्याच्या त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होते. घटनात्मक तरतुदींचा हवाला देत सुमारे ३० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या ड्रेस कोडवर आक्षेप घेतला आहे. तसेच कॉलेजला त्यांच्या नियमावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. मात्र, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहत नियम बदलण्यास नकार दिला आहे.
महाविद्यालयाच्या निर्णया विरोधात विद्यार्थिनी आणि काही सामाजिक संघटनांनी भेदभाव आणि धार्मिक असहिष्णुतेचा आरोप करत राष्ट्रीय आणि राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते अतीक अहमद खान यांनी विद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेत विद्यार्थ्यांसोबत होत असलेल्या असहिष्णु वागणुकीवर नाराजी व्यक्त करत त्यांच्या भूमिकेवर टीका केली. “जेव्हा आम्ही त्यांना सांगितले की मुस्लिम पालक मुलींना हिजाबशिवाय शिक्षण घेऊ देऊ शकत नाहीत, तेव्हा महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की जर यामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा येत असेल तर त्यांनी अशी वेशभूषा परिधान करू नये. आम्ही कॉलेजच्या या निर्णयाला विरोध केला तसेच ड्रेस कोड जबरदस्तीने लादू शकत नसल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या प्राचार्या विद्यागौरी लेले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे.
संबंधित बातम्या