राज्यात येत्या तीन ते चार महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यात प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असली तरी तिसरी आघाडीही आकार घेत असल्याचं दिसत आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेने विधानसभेची तयारी सुरू करून उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी (chatrapati sambhaji raje) केली आहे. त्यातच त्यांनी मनोज जरांगे व राजरत्न आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत.
मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या मराठा आरक्षण जनसंवाद जागृती यात्रेची मंगळवारी नाशिकमध्ये सांगता झाली. त्यांनी शरद पवारांवर पहिल्यांदाच हल्लाबोल करताना कुणाला निवडायचे व कुणाला पाडायचे याचा निर्णय २९ ऑगस्टला घेणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी मराठा समाजाला आंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मराठा समाज निवडणूक लढणार की नाही, याचा फैसला २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यातच 'स्वराज'पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी विधानसभा निवडणुकांसंदर्भात मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मनोज जरांगे पाटील आणि माझं उद्दिष्ट एकच आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी जरांगें यांना भेटून चर्चा करणार आहे. मनोज जरांगे पाटलांना नेहमीच माझा पाठिंबा राहिलेला आहे. मनोज जरांगेंसोबत अद्याप चर्चा झाली नाही परंतु ही चर्चा लवकरच होणार आहे. आमचे पणजोबा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनीच कोल्हापुरात पहिल्यांदा आरक्षणाची सुरूवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते घटनेत अंमलात आणले.
त्याचबरोबर मराठा-ओबीसी वाद होऊ नये, असे मला वाटते. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला आहे. आता सगळ्यांनी एकत्र बसणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. शाहू महाराजांनी जे आरक्षण दिले त्यात अनुसुचित जाती-जमाती, मराठ्यांचाही त्यात समावेश होता.सर्व जातींना आरक्षण मिळाले पाहिजे, मात्र ते घटनेत कसे बसवायचं ते पाहावे लागेल.
दरम्यान, संभाजी राजे म्हणाले स्वराज्य पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार आहे.आमचे उमेदवारनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र किती जागा लढवायच्या हे अजून ठरलेले नाही. स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न आहे. आम्हालासर्वपर्याय खुले आहेत. महायुती-महाविकास आघाडीसोबत जाण्याचा आमचा संबंध येत नाही. तिसऱ्या आघाडीचा पर्यायही नाकारता येत नाही. आज माझ्यासोबत राजरत्न आंबेडकर (𝐑𝐚𝐣𝐫𝐚𝐭𝐧𝐚 𝐀𝐦𝐛𝐞𝐝𝐤𝐚𝐫) आहेत. ही सुरुवात झाली असून हा पहिला टप्पा आहे.आमच्यासाठी सर्वपर्याय खुले असल्याचेहीसंभाजीराजे यांनी सांगितले.