Pune Traffic Change due PM Narendra Modi Sabha: पुण्यात आज, बारामती, शिरूर, मावळ, पुणे लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज संध्याकाळी रेस कोर्स येथे सभा होत असल्याने वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. येथे होणारी गर्दी पाहता दुपारनंतर लष्कर, तसेच या परिसरातील काही रस्ते वाहतुकीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तर वाहने पार्क करण्यासाठी देखील जागा नेमून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात आज रेसकोर्स येथे मोदी यांची सभा होत आहे. त्यामुळे येथील पाणी टाकी ते टर्फ क्लब चौक मार्गावर दुहेरी वाहतुक करण्यात आली आहे. टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तर सोलापूर रस्त्यावरील अर्जुन रोड चौक ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. टर्फ क्लब चौक ते बिशप स्कूल चौक रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहनचालकांनी मम्मादेवी चौक, बेऊर रस्ता चौकातून पुढे त्यांच्या इच्छितस्थळी जावे.
तर सोलापूर रस्त्यावरील गोळीबार मैदान ते भैरोबा नाला चौक हा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांना भैरोबा नाला चौकातून लुल्लानगर चौकातून इच्छितस्थळी जावे लागणार आहे. तर मोर ओढा चौक ते भैरोबा नाला (एम्प्रेस गार्डन रस्ता) या मार्गावरील वाहनचालकांनी मोर ओढा, घोरपडी रेल्वे फाटक, बी. टी. कवडे रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे असे आवाहन करण्यात आले आहे. वाहनचालकांनी वॉर मेमोरीयल चौक, घोरपडी गाव, ढोबरवाडीमार्गे इच्छितस्थळी जावे, असे देखील वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
सभेला होणारी गर्दी पाहता वाहने पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात अलायी आहे. वाहतूक विभागाने पुणे-सोलापूर रस्ता, सासवड रस्त्याने पुण्याकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाचालकांनी भैरोबा नाला चौक ते वानवडी बाजार चौकी दरम्यान वाहने लावावीत असे आवाहन करण्यात आले आहे. वानवडी बाजार ते लष्कर भागातील मम्मादेवी चौक दरम्यान वाहनचालकांनी वाहने लावावीत. नगर, पिंपरी-चिंचवड भागातून सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी सर्किट हाऊस, मोरओढा चौक, वॉर मेमोरिएल चौक ते घोरपडी गाव, घोरपडी रेल्वे गेट, आर्मी पब्लिक स्कूल येथे वाहनतळ करण्यात आले आहे. सिंहगड रस्ता, स्वारगेट सातारा, भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी बेऊर रस्ता चौक, लष्कर भागातील कोयाजी रस्ता, अंतर्गत रस्ते, तीन तोफा चौक (हॉटेल डायमंड क्वीन परिसर, लष्कर भाग), बिशप स्कूल परिसरात वाहनतळ तयार करण्यात आले आहे. तर खासगी बस लावण्यासाठी हडपसर भागातील रामटेकडी औद्योगिक वसाहत येथे वाहनतळ तयार करण्यात आले आहे. भैरोबा नाला ते आर्मी पब्लिक स्कूल परिसरात अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पंतप्रधानाच्या सभेच्या निमित्ताने पुणे शहरातून जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सोलापूर रस्ता, थेऊर फाटा, सासवड रस्ता, मंतरवाडी फाटा, बोपदेव घाट रस्ता, खडी मशीन चौक, सातारा रस्ता, कात्रज चौक, सिंहगड रस्ता, वडगाव पूल, पौड रस्ता, चांदणी चौक, बाणेर रस्ता, ओैंध रस्ता, राजीव गांधी पूल, जुना मुंबई-पुणे महामार्ग, हॅरिस पूल, आळंदी रस्ता, लोहगाव रस्ता, नगर रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, कोरेगाव पार्क परिसरात, मुंढवा ताडीगुत्ता चौक परिसरातील वाहतुकीचा वेग संथ राहणार असल्याने वाहनचालकांनी आज दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आज चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तब्बल ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त पुण्यात तैनात करण्यात आला आहे. मोदी यांच्या मार्गावर देखील ठीक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त पुढील दोन दिवस शहरात ड्रोन, पॅराग्लायडर, हलकी विमाने उडवण्यास बंदी करण्यात आली आहे. पोलिसांव्यतिरिक्त अन्य खासगी संस्थांना ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करायचा असेल तर त्यांनी विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
संबंधित बातम्या