Pune traffic Update : आज शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीने केले जाणार आहे. या साठी आयोजित सोहळ्यासाठी व्हीआयपी व्यक्ति उपस्थित राहणार असल्याने शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरात वाहतूक बदलण्यात आली आहे. त्यामुळे जर आज घराबाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर वाहतुकीची माहिती घेऊनच बाहेर पडावे लागणार आहे.
पावसामुळे गुरुवारी रखडलेले पुणे मेट्रोच्या शिवाजी नगर कोर्ट ते स्वारगेट मार्गीकेचे उद्घाटन आज केले जाणार आहे. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ पासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यामुळ शिवाजी नगर कोर्ट आणि गणेश कला क्रीडा मंच येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
जेधे चौक ते बजाज पुतळा रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना सकाळी ७ पासून ते आवश्यक वेळेपर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे. जेधे चौक ते बजाज पुतळा चौक दरम्यान आवश्यकते नुसार दुतर्फा वाहतुक सुरु करण्यात येईल. जेधे चौक ते बजाज पुतळा चौक दरम्यान आवश्यकते नुसार सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : जेधे चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी जेधे चौकातून सातारा रोडने व्होल्गा चौकात जावे. उजवी कडे वळण घेवुन मित्र मंडळ चौक उजवीकडे वळण घेवुन सावरकर पुतळा चौक येथुन इच्छित स्थळी जावे. सातारा रोड वरुन येणाऱ्या वाहनचालंकाना जेधे चौक उड्डाण पुल सोलापुर रस्त्याकडे जाण्यासाठी सुरु राहील.
छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक व तोफखाना चौक ते रानडे पथ या दोन्ही रस्त्यावर सकाळी ७ ते ४ दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्किंग करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक हा मार्ग अत्यावश्यक वेळी दुहेरी वाहतुक सुरु करण्यात येणार आहे.