Lonavala Traffic Update : पुण्यातील लोणावळा हे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. शनिवार आणि रविवारी तर या ठिकाणी पर्यटकांचा महापूर असतो. येथील भुशी डॅम, टायगर पॉइंट, ईको पॉइंट या सारख्या अनेक ठिकाणी पर्यटकांची रेलचेल असते. दरम्यान येथे होणारी पर्यटकांची गर्दी पाहता आता येथील शनिवार, रविवार व सुट्यांच्या दिवसात वाहतुकीत बदल करण्यात आला आहेत. येथील वाहतूक नियोजनासाठी पुण्यातून १०० अतिरिक्त पोलिस कर्मचारी, अधिकारी, होमगार्ड तैनात केले जाणार आहे. दरम्यान, या वाहतूक बदलांची दखल पर्यटकांनी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात लोणावळा, खंडाळा तसेच मुळची आणि मावळ तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळांना पर्यटक भेटी देत असतात. त्यात सर्वाधिक पर्यटक हे लोणावळा येथे जात असतात. येथील निसर्ग सौन्दर्य पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खुलते. त्यामुळे मुंबई येथून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी अचानक मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने येथील छोट्या रस्त्यांवर आणि पोलिसांवर वाहतुकीचा ताण येत असतो. त्यामुळे येथील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी येत्या शनिवार आणि रविवार पासून येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अंबरवाडी गणपती मंदिर या अंतर्गत रस्त्यावरून सरळ पुण्याच्या दिशेने जाणारी वाहने इंदिरानगर, तुंगार्ली येथून नारायण धाम पोलिस चौकीसमोरून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आली आहे.
तर भुशी धरणाकडून माघारी फिरणारी वाहने ही पुण्याकडे जाण्यासाठी कैलासनगर स्मशानभूमी येथून हनुमान टेकडी, कुसगाव गणपती मंदिरमार्गे सिंहगड कॉलेज येथून मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर सोडण्यात येणार आहेत. तर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने रायवूड पोलिस चौकी येथून खंडाळा गेट नंबर ३० व अपोलो गॅरेज येथील रेल्वे गेट येथून बाहेर सोडण्यात येतील.
वाहतुकीच्या नियोजनासाठी कुमार पोलिस चौकी येथे एक कंट्रोल रूम, कुमार पोलिस चौकी ए वन चिक्की चौक, मीनू गॅरेज चौक, सहारा पूल येथे भोंग्यांवरून वाहनचालकांना सूचना दिल्या जाणार आहेत. भांगरवाडी इंद्रायणी पूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौकदरम्यान वनवे सुरू केला जाणार आहे. तर लोणावळ्यात येणारी वाहने पुरंदरे शाळेसमोरील रस्त्यावरून व भांगरवाडीच्या दिशेने जाणारी वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुख्य रस्त्याने सोडण्यात येणार आहेत.
मॅकडोनाल्ड समोर रस्त्यावर वाहने उभे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, तसेच टोइंग व्हॅनद्वारे वाहनांवर कारवाई होणार आहे.
भुशी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे आता येथे रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. जेथे पार्किंगची व्यवस्था केली आहे, तेथेच पर्यटकांनी आपली वाहने उभी करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. खंडाळा राजमाची पॉइंट परिसरातही रस्त्याच्या बाजूला वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी वाहने उभी करण्याच्या पोलिसांच्या सूचना आहेत.
हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, लोणावळ्यातून ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे, अशा पोलिस मित्रांचीही एक टीम तयार केली असून त्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
संबंधित बातम्या