Chandrapur Rape News : बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतांना चंद्रपूर येथे देखील अशीच घटना उघडकीस आली आहे, येथील एका बड्या शाळेत ११ वर्षीय मुलीवर शिक्षकाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिल्यावर कोरपना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल लोडे आरोपीचे नाव असून चंद्रपूर येथील नामांकित शाळेत हा शिक्षक आहे. तसेच आरोपी शिक्षक युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शाळेत क्लासेस करता आली होती. यावेळी अमोल लोंढे या आरोपी शिक्षकाने मुलीला ऑफिसमध्ये चल म्हटले. यानंतर त्याने ऑफिसमध्ये कुणी नसल्याची संधी साधत पीडित मुलीला धमकावत दोन गोळ्या खान्यासाठी दिल्या. यानंतर पीडित मुलीवर त्याने कार्यालयात बलात्कार केला. यानंतर तिला धमकावले तसेच तिला आणि तिच्या घरच्यांना जीव मारण्याची धमकी आरोपीने दिली.
या घटनेमुळे चंद्रपुरात खळबळ उडाली आहे. आरोपी हा राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कोरपना येथील शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असून तो एका खासगी शाळेत शिक्षक आहे. आरोपी हा उन्हाळ्यात शाळेत अतिरिक्त वर्ग घेत होता. या साठी तो मुलांना शाळेत बोलवत होता. याच क्लासमध्ये त्याने मुलीला बोलवत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, भीतीपोटी मुलीने ही घटना कुणालाही सांगितली नाही.
मात्र, मुलीला त्रास होत असल्याने या घटनेची कुणकुण घरच्यांना मिळाली. या नंतर मुलीला पालकांनी विश्वासात घेऊन तिला या प्रकरणी माहिती विचारली. यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, मुलीच्या पालकांनी मुलीला घेऊन थेट पोलिस ठाणे गाठत लोडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला असून अमोल लोडेवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच आरोपी हा फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे. लवकरच आरोपी आमच्या ताब्यात असेल व त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.