राज्यात बारावीच्या बोर्ड परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. मात्र परीक्षेच्या तणावातून एका विद्यार्थिनीने परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच आपले जीवन संपवल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. पुस्तकाच्या शेवटच्या पानावर ‘स्वारी’ लिहून या विद्यार्थिनीने परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच आपल्या आजोबाच्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुमित्रानगर तुकुम येथे घडली.
अनिशा खरतड (वय १९) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. अनिशाचे वडील चंद्रपूर पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
अनिशा आई-वडील बहीण व भावासह सुमित्रानगर येथे रहात होती. तिचे आजोबा त्यांच्या अपार्टमेंटच्या जवळच राहतात. त्यामुळे ती आजोबांच्या घरी जाऊन अभ्यास करत होती. अनिशाने गेल्या वर्षीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र गणितामध्ये अधिक गुण मिळावे यासाठी ती पुनर्परीक्षा देणार होती.
मंगळवारी रोजच्या प्रमाणे ती आजोबांच्या घरी अभ्यासासाठी गेली. बराच वेळ झाल्यानंतरही ती परत आली नाही. त्यामुळे तिचे आई-वडील त्याठिकाणी गेले. दरवाजा उघडला असता आतील दृष्य पाहून त्यांना धक्का बसला. अनिशा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. याबाबतची दुर्गापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दुर्गापूर पोलीसांनी घटनास्थळ दाखल होऊन पाहणी केली असता त्यांना नोटबुकच्या शेवटच्या पानावर ‘स्वारी’ लिहिल्याचे दिसून आले.