राज्यात गणेशोत्सवाची धामधूम असताना चंद्रपूर जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतात काम करणाऱ्या चार शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लावून मृत्यू झाला आहे. वीज प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपुर गावात घडली आहे. विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर २ जण गंभीर जखमी झाले. शेतामध्ये खत टाकण्यासाठी गेले असता चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
वन्यप्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान किंवा रानडुक्करच्या बंदोबस्तासाठी शेताच्या कुंपणात वीज पुरवठा सोडल्याच्या प्रकारातून ही दुर्घटना घडली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर (मेंडकी) येथे ही घटना घडली आहे. मृतांमध्ये गणेशपूर येथील पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे आणि नानाजी राऊत यांचा समावेश आहे. हे शेतकरी आज (बुधवार) सकाळी शेतात खत टाकण्यासाठी प्रकाश राऊत यांच्या शेतात गेले होते. मात्र शेतात पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेताच्या बाजूला जंगल आहे. त्यामुळे शेतपिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या घटनेत दोन शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या जबाबानंतरच खरा प्रकार समोर येणार आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि वीज मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास केला जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात एकाच वेळी चार शेत मजुरांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
गेल्या दोन दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्युत प्रभावित तारा शेतात पडल्या असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यावर घटनेचे सत्य समोर येणार आहे.