Chandrapur news : लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात बळी-chandrapur news 52 year old man death in tiger attack who going forest to cut wood ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrapur news : लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात बळी

Chandrapur news : लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात बळी

Nov 20, 2023 08:01 PM IST

Chandrapur News : चंद्रपूर शहराजवळच्या जुनोना जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एक व्याघ्र बळी गेला आहे. चंद्रपूर शहरालगतच्या जुनोना जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेलेल्या ५२ वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाकडे तोडत असताना वाघाने पाठीमागून त्यांच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून वाघांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

मनोहर विक्रम वाणी (वय ५२ ) असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मनोहर वाणी हे चंद्रपूर शहराच्या जवळ जुनोना बायपास मार्गावरील हनुमाननगर परिसरातील रहिवासी होते. सोमवारी सकाळी लाकडे तोडण्यासाठी ते जवळच्या जंगलात गेले होते. तेथे त्यांच्यावर वाघाने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला.

बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने कुटूंबीय व स्थानिकांनी त्यांचा शोघ घेतला. त्यावेळी जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. मनोहर चंद्रपूर शहरातील एका शाळेच्या स्कूल व्हॅनवर चालक म्हणून कामाला होते. घटनेची माहिती मिळताच वनपथक घटनास्थळी पोचले. शव पोस्टमार्टमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

या परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांना जंगलात जाण्यास बंदी आहे. तरीही लोक लाकडे आणण्यासाठी जंगलात जात असतात. वनविभागाद्वारे कॅमेरा ट्रॅप लावून या भागातील वाघाच्या हालचालींची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे

Whats_app_banner
विभाग