मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrapur News : प्रेमीयुगुलांचे शेतात संशयास्पद स्थितीत आढळले मृतदेह, हत्या की आत्महत्या? संशय बळावला

Chandrapur News : प्रेमीयुगुलांचे शेतात संशयास्पद स्थितीत आढळले मृतदेह, हत्या की आत्महत्या? संशय बळावला

May 28, 2024 09:16 PM IST

Chandrapur Crime News : चंद्रपूरमध्ये एका प्रेमीयुगुलाचा मृतदेह शेतात संशयास्पद स्थितीत आढळल्याने त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याचा तपास पोलीस करत आहेत.

प्रेमीयुगुलांचे शेतात संशयास्पद स्थितीत आढळले मृतदेह, हत्या की आत्महत्या? (सांकेतिक छायाचित्र)
प्रेमीयुगुलांचे शेतात संशयास्पद स्थितीत आढळले मृतदेह, हत्या की आत्महत्या? (सांकेतिक छायाचित्र)

Chandrapur crime news : चंद्रपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका प्रेमीयुगुलाचे संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आले आहेत. दोघांचे मृतदेह एका शेतात विहिरीजवळ आढळून आले आहेत. त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली,याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

ट्रेंडिंग न्यूज

रुपेश मधुकर मिलमिले (३२,रा.चिंतलधाबा) व शशिकला खुशाब कुसराम (२७,रा.भटारी) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही विवाहित असून आपआपल्या जोडीदारांना त्यांनी सोडले आहे. भटारी गावात राहणारी शशिकला कुसराम हिचा विवाह झाला असून सध्या ती पतीपासून विभक्त रहात होती. तर रुपेशही विवाहित असून त्याने दीड वर्षांपूर्वी पत्नीला घटस्फोट दिला होता.

रुपेशचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असून भाजी विक्रीसाठी तो नियमितपणे भटारी गावात जात होता. यादरम्यान दोघांची ओळख झाली व कालांतराने ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडले. सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या. सोमवारी दुपारी शशिकला व रुपेश हे दोघेही गणेश मिलमिले यांच्या शेतात गेले व तेथे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. रुपेशचा मृतदेह विहिरीत तर शशिकलाचा मृतदेह विहिरीच्या बाजूला पडलेला आढळून आला. (love couple dead bodies)

स्थानिकांना मृतदेह आढळून आल्यावर याची माहिती पोंभूर्णा पोलीसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला अन् दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पहाटेच्या सुमारास मृतदेह रुग्णालयात आणून देखील मंगळवारी चार वाजेपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते.

त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोन्ही मृतदेह फॉरेन्सिक मेडीसिन टॉक्सीकोलॉजी शवविच्छेदनासाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले. मंगळवारी सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. पोंभुर्ण्यात शवविच्छेदन न झाल्याने या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आत्महत्या की घातपात याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. दोघांनी आत्महत्या केली की त्यांची कोणी हत्या केली, याचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग