चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला हादरवणारी एक घटना उघडकीस आली आहे. पुतण्याने सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या काकुचा पुतण्याने दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील सोनापूर येथे दुपारी ३ च्या सुमारास घडली.
पुष्पा मधुकर ठेंगणे (वय ६२) असे खून करण्यात आलेल्या काकुचे नाव आहे. तर धीरज ठेंगणे (वय २०) असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. आरोपी हत्या केल्यानंतर फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनापूरमधील पुष्पा ठेंगणे यांची सून काल दुपारी शेतातून परत येत असतांना आरोपी धीरज ठेंगणे याने तिला रस्त्यात गाठून तिच्यावर बलात्कार करण्याच्या प्रयत्न गेला. मात्र तिने प्रतिकार करत आरोपी धिरजच्या तावडीतून सुटून तेथून पळ काढला. ही घटना तिने सासू पुष्पा हिला सांगितली. यामुळे पुष्पा यांचा राग अनावर झाला. त्या रागाच्या भरात याचा जाब विचारण्यासाठी धिरज याच्याकडे गेल्या.
यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात धिरजने पुष्पा हीच्या डोक्यात दगड घालून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने पुष्पा यांचा मृतदेह घराशेजारच्या शेणाच्या खड्ड्यात टाकून धिरज हा फरार झाला. दरम्यान पुष्पा यांच्या शोधात आलेल्या त्यांच्या मुलाला त्यांचा मृतदेह हा धिरजच्या घराजवळील शेणाच्या खड्ड्यात पडलेल्या दिसला. त्याने ही माहिती पोंभुर्णा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
संबंधित बातम्या