गेल्या १५ दिवसापासून चिमूर तालुक्यातील बेपत्ता असलेल्या व्यापारी महिलेचा मृतदेह आज (१० डिसेंबर) नागपुरातील बेसा येथील निर्जन स्थळी आढळला. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. या महिलेचा मित्र असलेला पोलीसच तिचा मारेकरी निघाला आहे. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याला अटक केली आहे. हत्या करणारा पोलीस आणि महिला हे एकाच शाळेत शिकले होते, त्यामुळे ते वर्गमित्र होते, पण त्यांच्यामध्ये काहीतरी वाद सुरू होते. या वादातूनच आरोपीने महिलेची हत्या केली.
या प्रकरणातील आरोपी नरेंद्र डाहुले हा बडतर्फ पोलीस कर्मचारी आहे. तर अरुणा अभय काकडे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून त्या व्यापारी होत्या. आरोपी नरेश डाहुले याला चंद्रपूर शहर पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्याने आपल्या मैत्रिणीचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने मृतदेह नागपूर शहरातील बेलतरोडी रस्त्यावरील वेळाहरी गावाजवळच्या जंगलात पुरला. या आरोपीला चंद्रपूर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणी अटक केली होती, त्यानंतर ही बाब उघडकीस आली.
अरुणा काकडे या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील रहिवासी होत्या. अरुणा या जनरल स्टोअर्स दुकान चालवत होत्या. २६ नोव्हेंबर रोजी दुकानासाठी काही सामान घेण्यासाठी नागपुरात आल्या होत्या. त्यानंतर अरुणा नागपूरच्या गांधीबाग परिसरात पोहोचल्या. दुपारी १२ वाजता अरुणा यांनी पतीला फोन करून सामान घेऊन चिमूरला येणार असल्याची माहिती दिली.
त्यानंतर महिलेचा फोन बंद झाला. संध्याकाळ होऊनही पत्नी घरी न परतल्याने पतीने तिची शोधाशोध सुरू केली. पत्नी कुठेही न सापडल्याने पतीने चिमूर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलीसांनी बेपत्ता महिलेचा शोध सुरू केला. अखेर चंद्रपूर पोलिस दलाच्या सायबर सेलने तांत्रिक तपास करून महिलेच्या मोबाईलचा सीडीआर काढला, यामध्ये चंद्रपूर पोलीस दलातील बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेंद्र डाहुले याचाही सहभाग असल्याचे संकेत मिळाले.
नरेंद्र डाहुले याला नुकतेच चंद्रपूर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली, त्यात त्याने अरुणाचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नागपूरच्या काही भागात कार फिरवली. कुठेही जागा न मिळाल्याने बेलतरोडी रोडवरील वेळाहरी गावाजवळील जंगलात मृतदेह पुरल्याचे आरोपीने सांगितलं आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
मृत महिला अरुणा काकडे आणि आरोपी नरेश डाहूले लहानपणापासून एकाच शाळेत शिकले होते. दोघे वर्गमित्र होते. तसेच त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचेही म्हटले जात आहे. २६ तारखेला मृतक अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते. दरम्यान, या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला होता. नागपूरमध्येही दोघांच्यात वाद झाल्यानंतर रागाच्या भरात आरोपीने अरुणाचा गळा दाबून खून केला.