Chandrakant Patil and Gaja Marane : गुंड आणि पुढारी यांचं साटलोट असतं हे सर्वश्रुत आहे. राज्यात अनेक राजकीय नेत्यांचे गुंडांसोबतचे फोटो व व्हिडिओ या पूर्वीही व्हायरल झाले आहेत. पुण्यातील अट्टल गुंड असलेल्या गजा मारणे यांचा घरी जाऊन अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी भेट घेतली होती. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी देखील गुंड गजा मारणेची भेट घेत त्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला होता. या दोन्ही नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. असे असतांनाही भाजपचे जेष्ठ नेते व माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दहीहंडी उत्सवादरम्यान, गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारला. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली जात आहे.
पुण्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. अनेक इच्छुक पुन्हा तयारीला लागले आहेत. त्यात चंद्रकांत पाटील यांची कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी आहे. या साठी येथील कार्यक्रमात ते भेटी गाठी वाढवण्यावर भर देत आहेत. मंगळवारी देखील कोथरूड मधील एका दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी एका मंडळाला भेट दिली होती. या कार्यक्रमात गुंड गजा मारणे याने चंद्रकांत पाटील याची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ भेट देत स्वागत केलं. त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे विरोधक चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. तर यावर चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देणार या कडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.
या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर पार्थ पवार यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. यावर अजित पवार यांनी मैदानात उतरत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला होता.
खासदार झाल्यावर अहमदनगरचे खासदार नीलेश लंके ही पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी देखील गजा मारणे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला होता. यानंतर त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका हली होती. यानंतर नीलेश लंके यांनी गजा मारणे याच्याशी झालेली भेट ही केवळ अपघात असून मला गजा मारणे यांची पार्श्वभूमी माहिती नव्हती, असे उत्तर देत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला होता.
गजा मारणे पुण्यातील अट्टल गुंड आहे. अमोल बधे व पप्पू गावडे खून प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्याला ३ वर्ष कारावासाची शिक्षा झाली होती. सध्या तो मारणे टोळीचा प्रमुख आहे. त्याचीवर २३ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.