Ambadas danve vs Sandipan bhumre : औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार- संदीपान भुमरे आणि अंबादास दानवे यांच्यात जोरदार वादावादी झाली आहे.
ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरेयांच्यात जोरदार राडा झाला होता. यावेळी वाद एवढा पेटला की,विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचं दिसलं होतं. यावरून जिल्ह्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता यावर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, अंबादास दानवे यांनी जे केलं ते योग्यच होतं. मी असतो तर मारलं असतं, असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं.
चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, भाजपच्या सत्तेत राज्यात सर्वत्र सावळा गोंधळ सुरू आहे. आज ते लोकसभेची तयारी करत असल्याचा भास निर्माण करत आहेत. मात्र ते ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये आपल्याला अंधारात ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेतील. त्यामुळे आमची तयारी सुरू केली आहे, असं चंद्रकांत यांनी सांगितलं आहे.
पालकमंत्री संदीपान भुमरे निधी देत नाहीत, असा आरोप कन्नड मतदारसंघाचे आणि ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत केला होता. याच मुद्द्यावरून अंबादास दानवे आक्रमक झाले. त्यामुळे भुमरे आणि दानवे यांच्यात वाद पेटला.
निधीवाटपाचा मुद्दा दानवे यांनी आक्रमकपणे मांडला. त्यामुळे वातावरण चांगलंच पेटलं. त्यावर औरंगाबादचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनीही प्रत्युत्तर दिलं. यावेळी अंबादास दानवे हे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर भुमरेही मोठ्या आवाजात दानवेंना प्रत्युत्तर देत होते. त्याचा व्हि़डीओ देखील व्हायरल होत आहे.