Chandrakant khaire controversial statement : मालवण सुमद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. महाआघाडीकडून रविवारी मुंबईसह राज्यभर 'जोडे मोरो' आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांनी पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
देशात कुठेही महापुरुषांच्या पुतळ्यांची तोडफोड केली तर त्या भागात दंगली होतात. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका मोठा पुतळा कोसळला अन् आम्ही या सरकारच्या विरोधात बोलायचंसुद्धा नाही का? असा प्रश्न खैरे यांनी उपस्थित केला आहे.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा (Chhatrapati Shivaji maharaj statue collapse) पडल्यापासून महाविकास आघाडी सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहे. दरम्यान, आज मविआने राज्यात राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन केले.रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. यानिमित्ताने महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले.
जोडे मारो आंदोलना दरम्यान चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे. राज्यात दंगली झाल्या पाहिजे. राज्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची कोणी विटंबना केली तर दंगली उसळतात. अख्खी गावं पेटवली जातात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतरही दंगली का होत नाही? महाराष्ट्रातदंगली झाल्या पाहिजेत. आम्ही देखील सरकारविरोधात बोलू नये असं वाटतं का? उलट हे सरकार पदच्युत झालं पाहिजे. कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. अशी प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून क्रांती चौक परिसर दणाणून सोडला.यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची छायाचित्र आणली होती. मात्र पोलिसांनी ती त्यांच्याकडून हिसकावून घेतली.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, आम्ही महायुती सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करत आहोत. आम्हाला रोखलं तरी आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार. कितीही पोलीस आले तरी आम्ही मागे हटणार नाही.