chandivali news : साकीनाका, चांदिवली विभागात प्रेशर कूकर घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे व मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा सुरू केली आहे.
महिला सक्षमीकरण योजनेच्या नावाखाली काही दिवसांपूर्वी आमदार दिलीप लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांदिवली, साकीनाका विभागातील महिलांना प्रेशर कूकरचं वाटप केलं होतं. मात्र या प्रेशर कूकर वाटपात मोठं गौडबंगाल असल्याचं नंतर समोर आलं. हे प्रेशर कूकर मुंबई महापालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी खरेदी केले होते. हे खरेदी करण्यासाठी टेंडर काढण्यात आलं होतं. प्रत्यक्षात हे कूकर वाढीव भावात खरेदी करण्यात आले. तेही निकृष्ट दर्जाचे होते असा आरोप आहे. टाइम्स ऑफ इंडियानं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.
अॅडव्होकेट निखिल कांबळे यांनी या घोटाळ्याची तक्रार दाखल केली आहे. 'एल वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी एका खासगी कंत्राटदाराकडून ४१ हजार प्रेशर कूकर टेंडर काढून खरेदी केले. आर्थिक दुर्बल घटकातील व दारिद्र रेषेखालील महिलांना या प्रेशर कूकरचं वाटप करण्याचा हेतू होता. मात्र, बाजारात प्रत्येकी १५४५ रुपये भाव असलेले हे कूकर प्रत्यक्षात २,४०० रुपयांत खरेदी करण्यात आले, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
कांबळे यांनी या संदर्भात महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांकडं तक्रार दाखल केली. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या देखरेखीखाली हा गैरव्यवहार झाला आहे. असं असतानाही कुठलीही कारवाई झालेली नाही. प्रेशर कूकरचं वाटप महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य व पारदर्शक पद्धतीनं करणं अपेक्षित होतं. मात्र ते स्थानिक आमदाराकडं सोपवण्यात आले व त्यांनी ते निवडक लोकांना वाटून टाकले, असा आरोप कांबळे यांनी केला आहे.
चांदिवलीतील समाजसेवक मनदीपसिंग मक्कर यांनीही याविरोधात आवाज उठवला आहे. हा सरळसरळ आर्थिक गैरव्यवहार व घोटाळ्याचा प्रकार आहे. बाजारात उत्तम ब्रँडचे कूकर उपलब्ध असताना निकृष्ट दर्जाचे कूकर वाढीव भावात का खरेदी करण्यात आले याचं उत्तर महापालिकेनं द्यायला हवं, अशी मागणी मक्कर यांनी केली आहे. या कूकरवर दिलीप लांडे यांचं नावही कोरल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं.
हे कूकर मिळालेल्या रहिवाशांनी त्यांच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला मिळालेला कूकर अगदीच कमी क्वालिटीचा आणि अन्न शिजवण्यासाठी काही कामाचा नाही. या कूकरचे झाकण ढिले आहे. त्यातून वाफर निघून जाते. वापर करण्याआधी आम्हाला ते दुरुस्त करावे लागले. वापरण्यासाठी ते धोकादायक आहेत, असं एका लाभार्थी महिलेनं इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
प्रेशर कूकर खरेदी गैरव्यवहाराशी माझा कुठलाही संबंध नसल्याचं दिलीप लांडे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं आहे. सर्व प्रक्रिया महापालिकेची अंतर्गत प्रक्रिया होती. विभागात नगरसेवक नसल्यामुळं मला कूकर वाटपाच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं होतं. बीएमसीनं आमंत्रण दिल्यानं मी तिथं गेलो होते. काही गैरव्यवहार झाला असेल तर ती जबाबदारी बीएमसीची आहे, असंही लांडे यांनी सांगितलं.
बीएमसी एल वॉर्डचे अधिकारी धनाजी हेर्लेकर यांच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही जे काही केलं, ते नियमानुसार केलं आहे. विभागात नगरसेवक नसल्यामुळं कूकर वाटपासाठी आमदारांना बोलावण्यात आलं होतं.'