मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PM Modi in Yavatmal : मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर ही लोकभावना; काँग्रेस नेत्यानं संधीच साधली!

PM Modi in Yavatmal : मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर ही लोकभावना; काँग्रेस नेत्यानं संधीच साधली!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 28, 2024 06:22 PM IST

Nana Patole on PM Modi Yavatmal Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळवरील सभेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Rahul Gandhi stickers in Yavatmal BJP Rally
Rahul Gandhi stickers in Yavatmal BJP Rally

Nana Patole on PM Modi Yavatmal Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज यवतमाळ दौऱ्यावर असून तिथं ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या सभेसाठी आणलेल्या खुर्च्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो दिसत असल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ही संधी साधत भाजपवर तोफ डागली आहे. 'मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे फोटो लावून जनतेनं योग्य तो संदेश दिला आहे, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

‘आमचा लढा १३८ वर्षांचा’ असं लिहिलेले राहुल गांधी यांच्या फोटोचे स्टिकर यवतमाळच्या सभेतील खुर्च्यावर आहेत. सोशल मीडियात हे स्टिकर व्हायरल झाले आहेत. त्यावरून चर्चेला पेव फुटलं आहे. त्याच अनुषंगानं पटोले यांनी हे भाष्य केलं आहे. मुंबईत ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मोदींच्या कार्यक्रमावर १५ कोटींहून अधिक खर्च

'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीनं भरून सभेला नेण्यात आलं आहे. विदर्भ, मराठवाड्यातील बस मोदींच्या सभेसाठी वापरल्यानं जनतेचे हाल होत आहेत. मोदींच्या सभेचा खर्च भाजपनं करण्याऐवजी तो सरकारी तिजोरीतून करण्यात आला आहे. केवळ मंडपावरच १२ कोटी ७३ लाख ३३ हजार ५०० रुपये खर्च केला असून हेलिपॅडसाठी ३.५ कोटी रुपये खर्च केले असून ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

भाजपसाठी कायदा वेगळा आहे का?

‘जनता नरेंद्र मोदी व भाजपला कंटाळली आहे. स्वयंघोषित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या राजकीय सभेसाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आणून गर्दी जमवण्यात आली आहे. बसमध्ये महिलांना कोंबून बसवले आहे, एखाद्या वाहनात जास्त लोक बसले तर RTO कारवाई करतात मग यांच्यावर कारवाई कोण करणार? भाजपसाठी कायदा वेगळा आहे का?,’ असा सवाल पटोले यांनी केला.

यवतमाळची जनता दुसऱ्यांदा फसणार नाही!

याच यवतमाळमध्ये २०१४ च्या निवडणुकी वेळी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दीडपट भाव देणार, स्वामीनाथन अहवाल लागू करणार, सत्तेत येताच पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करणार, अशी आश्वासने दिली होती, परंतु सत्तेत येतात मोदी सर्व विसरले आणि तो चुनावी जुमला होता असे म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक केली. यवतमाळ संतांची भूमी आहे, संतांच्या भूमीत नरेंद्र मोदी खोटे बोलले. आता यवतमाळची जनता व शेतकरी मोदींच्या भूलथापांना फसणार नाहीत. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, शेतकरीच भाजपला त्यांची जागा दाखवून देईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

IPL_Entry_Point