Chagan Bhujbal on manoj jarange: राज्यातओबीसी व मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असताना छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. भुजबळांनी आज शेगावमध्ये एका कार्यक्रमात जरांगे पाटलांवर पुन्हा निशाणा साधला. आरक्षण मिळाले म्हणजे नोकरी मिळते, हे याला कोणी सांगितलं. जालन्याचा गडी काय ऐकायलाच तयार नाही,असा टोला भुजबळांनी जरांगेंना लगावला. माळी समाजाच्या मेळाव्यानिमित्त भुजबळ आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आरक्षणासह चौफेर राजकीय टोलेबाजी केली.
ज्येष्ठ नेते असल्याने मंत्रिपदाचे दावेदार असूनही छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले,यावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले की, आपल्यावर अन्याय होत आहे, पण अद्याप आपण खचलो नाही,अजून लढाई संपलेली नाही. आपण लढत राहणार आहे. मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळांनी पक्षावर दबाव वाढवला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर परदेश दौऱ्यावर गेलेले भुजबळ पुन्हा सक्रीय झाले आहेत. आज शेगावात त्यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. मी राजकारणात अनेक वर्ष आहे. राजकारणात असताना मी अनेकांचे पतंग कापले आहेत. त्यामुळे माझा पतंग कोणी कापणार नाही, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे.
भुजबळ म्हणाले, इतर समाजाला सरकारकडून शिक्षणासह अन्य कामांसाठी निधी मिळतो, तसा ओबीसी समाजाला मिळत नाही. मी मराठा समाजाविरोधात किंवा त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. पण त्यांना ओबीसीतून न देता वेगळे आरक्षण द्या, इतकंच म्हणणं आहे.
मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधताना भुजबळ म्हणाले की, जालन्याचा गडी ऐकायला तयार नाही. माझ्या लेकरा-बाळांना आरक्षण द्या म्हणत आहे. आरक्षण मिळाले म्हणजे नोकरी मिळते असे याला कोणी सांगितले,असा टोला त्यांनी लगावला. ज्याप्रमाणे ५८ मोर्चे मराठा समजायचे निघाले तसे गुजरातमध्येही पाटीदार समाजाचे मोर्चे निघाले. त्यांना १० टक्के आरक्षण दिले. त्यांची आंदोलने थांबली मात्र यांची आंदोलने सुरूच आहेत.
..अशा लाडक्या बहिणींनी अर्ज काढून घ्यावेत -
लाडकी बहीण योजनेबाबत भुजबळ म्हणाले की, या योजनेचा लाभ काही प्रमाणात नको त्यांना झाला आहे. हे काही प्रमाणात खरं आहे. या योजनेचे नियम आता बदलले आहेत. त्यात सरकारी नोकरदार असलेल्या घरात, अडीत लाखांच्या वर उत्पन्न असलेल्यांना, चार चाकी वाहन असलेल्या महिलांना लाभ दिला जाणार नाही.
या योजनेचा लाभ गरीब महिलांना व्हावा असा उद्देश्य आहे. त्यामुळे जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावे योजनेतून काढून घ्यावीत. आतापर्तंत त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकारने परत घेऊ नये. मात्र याच्यापुढे जे नियमित नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावे. अन्यथा सरकारने दंडासह सर्व रक्कम वसुली करावी.
संबंधित बातम्या