'मुंबई शहरातून झोपडपट्ट्या काढून त्या सर्व मिठागरांच्या जमिनीवर हलवल्या जायला हव्यात', या केंद्रीय मंत्री आणि मुंबई (उत्तर) चे भाजपचे लोकसभा उमेदवार पीयूष गोयल यांच्या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गटाने) टीका केली आहे. गेली १० वर्षं केंद्रात भाजपचं पूर्ण बहुमत असलेलं सरकार आहे. तर राज्यात ८.५ वर्षं भाजपचं सरकार सत्तेवर आहे. मुंबईचा विकास करण्याच्या भरपूर संधी तुमच्या पक्षाला मिळाल्या होत्या. परंतु केंद्र सरकारकडून मुंबईकरांना काय मिळालं? मुंबईकरांची केवळ फसवणूक, आर्थिक लूट आणि अभिमानाला ठेच पोहचवण्याच काम भाजपनं केलं, अशी घणाघाती टीका माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘पियुष गोयल यांनी अचानक मुंबई (उत्तर) ची जागा लढवण्याचा निर्णय घेतला, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांवर हुकूमशाही राजवट लागू कराल आणि त्यांना बळजबरीने खारफुटीच्या जमिनीवर नेऊन सोडाल. त्यांनाही शाश्वत विकास हवा आहे, ज्याला आम्हा सर्व मुंबईकरांचा पाठिंबा आहे. भारताच्या विकासात झोपडपट्टीवासीयांचाही मोठा हात आहे. २०२२ पर्यंत प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर असण्याचे तुमच्या पक्षाचे आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही.’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. बिल्डर्सना फायदा व्हावा यासाठी भाजपचा मुंबईतील मिठागरांच्या जमिनींवर डोळा असून आम्ही आमच्या मिठागरांच्या जमिनींचं बिल्डर लॉबीपासून संरक्षण करू, असं ठाकरे म्हणाले. सध्याच्या राजवटीचा हेतू 'गरीबी हटाओ' नसून 'गरीब को हटाओ' असा आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तत्कालीन केंद्राय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना लॉकडाउनदरम्यान रेल्वे बंद करू नका अशी विनंती केली होती. तरीसुद्धा ट्रेन बंद करण्यात आली. परिणामी मोठया प्रमाणात मजुर वर्गाचे हाल झाले होते, यांची आठवण आदित्य ठाकरे यांनी करून दिली .
झोपडपट्टीतील कामगार वर्ग इलेक्टोरल बॉण्ड विकत घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका ठाकरे यांनी केली. उत्तर मुंबई प्रमाणे धारावी सुद्धा आपल्या मित्रांच्या घशात टाकायचा भाजपचा डाव असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. गरीबी हटाओ नाही, तर गरीब हटाव ही भाजपची मोहीम असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. तसंच विकसित पोर्टलमध्ये कामगारांचा हात मोठा असतो, मात्र झोपडपट्टी धारकांना मूळ जागेपासून त्यांना दुसऱ्या मिठागरच्या ठिकाणी नेऊन त्यांना बेघर करण्याचा डाव हा भाजपचा असल्याचं उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीतून समोर आला आहे. मात्र वंचित, गरीब झोपडपट्टी धारकांना त्यांना बेघर करणाऱ्याला आमचा तीव्र विरोध आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं .