मुंबई: काद्यांच्या वाढत्या किंमतींवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे परदेशी व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास नकार दिला आहे. यामुळे लाखो मेट्रिक टन कांदा पडून असून तो सडण्याच्या मार्गावर आहे. सरकारच्या निर्णया विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहे. दरम्यान, हा वाद सुरू असतांना केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत ट्विट करून माहिती दिली आहे.
कांदा निर्यात शुल्क वाढ प्रश्नी शेतकऱ्यांसोबत राजकीय नेतेही आक्रमक झाले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. यामुळे आज राज्यातील नेतेमंडळी दिल्लीत जाऊन सरकारशी चर्चा करणार आहे. दरम्यान, आता या प्रकरणी मोठी बातमी पुढे आली आहे.
केंद्र सरकार कांदा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत माहिती देतांना सांगितले की, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल २ हजार ४१० प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी केला जाणार आहे यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या जपानच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती घेऊन हे ट्विट केले आहे.
भारतातून परदेशात तब्बल अडीच हजार कंटेनरची निर्यात होते. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ही निर्यात खोळंबणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. या निर्णयाविरोधात मुंबई कृषी बाजार उत्पन्न समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. कांदा निर्णयात झाला नाही तर तो स्थानिक बाजारात विकला जाणार आहे. यामुळे कांद्याचे भाव कोसळणार आहे.
संबंधित बातम्या