Nashik crime : सध्या सोशल मीडियावर विविध ट्रेंड व्हायरल होत आहे. हे ट्रेंड फॉलो करत रील्स तयार करणाचे वेड तरुणांना लागले आहे. या साठी काही तरुण जीव धोक्यात घालून बिल्डिंगला लटकल्याची घटना पुण्यात घडली होती. तर आता दोन तरुणांनी रील्स तयार करण्यासाठी दोन तरुण रेल्वेच्या मोटारमनच्या केबिनमध्ये घुसल्याचा प्रकार पुढे आला आहे. रेल्वे पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजा हिम्मत येरवाल (वय २०) आणि रितेश हिरालाल जाधव (वय १८ दोघे रा. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेचे वृत्त असे की, हे दोघे २५ जुलै रोजी कसारा स्थानकात प्लॅटफॉर्म ४ वर उभ्या असलेल्या उपनगरीय रेल्वे ९५४१० च्या मोटरमनच्या केबिनमध्ये घुसले. एकाने अॅक्टिंग केली तर दुसऱ्याने त्याचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड देखील केला होता. हा व्हिडिओ व्हायरल होऊन रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. यामुळे संबंधित तरुणांवर कारवाईचे आदेश रेल्वे पोलिसांना देण्यात आले होते.
मध्य रेल्वेच्या RPF पथकाने सायबर सेलच्या सहकार्याने या दोघांना नाशिक येथून गुरुवारी (८ ऑगस्ट) रोजी अटक केली. त्यांची चौकशी केली असता आरोपीने सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी ट्रेनच्या मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली असून दोघांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
अलीकडेच ट्रेनमध्ये अशा प्रकारच्या रील्स तयार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. नुकतीच रेल्वे पोलिसांनी गुलजार शेख नामक तरुणाला रेल्वे रुळांशी छेडछाड केल्याप्रकरणी अटक केली होती. प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणणारी, रेल्वेच्या कामकाजात अडथळा आणणारी आणि रेल्वे कायदे आणि नियमांचे उल्लंघन करणारी अशी कृत्ये करू नयेत असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. या पूर्वी देखील रेल्वे पोलिसांनी एका तरुणाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यात त्याने रील्सच्या नादात त्याचे हात पाय गमावले होते.