Mumbai Rain Local Train Updates : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले आहे. रविवार पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना फटका बसला आहे. पावसाचा परिमाण रेल्वे सेवेला देखील बसला असून अनेक लोकल फक्त ठाण्यापर्यंत धावत आहेत. पावसामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या या २० ते ३० मिनिटांनी उशिरा धावत आहेत. मुंबईतील हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात पाणी साचले आहे. तर हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात देखील पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले आहे.
मुंबई, ठाणे परिसरात रविवार पासून जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही दिवस पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकाजवळ पाणी साचले आहे. तर यामुळे मध्य रेल्वेची सेवा फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहे. अनेक गाड्या या ठण्यापर्यंतच धावत आहेत. तर बदलापूर अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, वांगणी, नेरळ, कर्जत येथील प्रवाशांना ठाण्यापर्यंत लोकलने प्रवास करता येत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. सोमवारी सकाळपासून नागरिकांना पावसाचा फटका बसला. लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना तसेच कामाला जाणाऱ्या मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या ठप्प झाल्या. तर ठाण्याकडून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतुक ठप्प झाली आहे.
पावसामुळे लांब पल्ल्याच्या एक्प्रेस गाड्यांवर देखील परिणाम झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन रद्द करण्यात आली आहे. यामुळे पुण्याहून मुंबईला येणाऱ्यांचे देखील हाल झाले आहे.
मुंबईत झालेल्या पावसामुळे कुर्ला, अंधेरी, सांताक्रुझ येथील सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे कल्याणपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईत सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय.
मुंबईत शनिवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसामुळे कोकण रेल्वेवर देखील परिमाण झळ आहे. मुंबईत अनेक भागात संततधार सुरू आहे.
संबंधित बातम्या