Mumbai Local Train update : मुंबईकरांसाठी मंगळवारीची सकाळ मनस्ताप देणारी ठरली आहे. मध्य रेल्वेची ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरची लोकल सेवा कोलमडली आहे. या मार्गावरच्या स्लो आणि फास्ट लोकल ठप्प झाल्याने सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत असणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. ही ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती रेल्वेने एक्सवर पोस्ट करून दिली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही ओव्हर हेड वायर दिवा आणि कोपरदरम्यान रेल्वे स्थानकादरम्यान तुटली आहे. या ठिकाणी वायरचा तांत्रिक बिघाड झाल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे. यामुळे या स्थानकावर स्लो मार्गावर येणाऱ्या लोकल ट्रेन अडकून पडल्या आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे.
या बिघाडाची माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी तातडीने दिवा स्थानकावर व कोपरा स्थानकावर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या मार्गावरील रखडलेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, सकाळी मोठ्या प्रमाणात कामासाठी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत असल्याने या मार्गावरील रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे. मात्र, लोकल येत नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
मुंबई लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन आहे. लोकलने रोज मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. तसेच मुंबईतील त्यांच्या इच्छित कार्यालयात कामासाठी जात असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रेल्वेत सातत्याने बिघाड होत आहे. त्यामुळे याचा परिमाण लोकल सेवेवर होत आहे. आज झालेल्या बिघाडामुळे हजारो नागरिकांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या बिघडाचा मोठा फटका लाखो प्रवाशांना बसला आहे. दरम्यान, आज झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली असून लवकरच हा बिघाड दुरुस्त करून रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.