Central Railway Megablock : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आज शुक्रवारी आणि रविवारी मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे यार्डच्या देखभाल दुरुस्तीसाठी व स्थानकातील पोर्टल्स काढण्यासाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना हे वेळापत्रक पाहून घराबाहेर पाडण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॉक काळात आज पळसधरी ते भिवपुरी रोड दरम्यान अप व डाउन मार्गावर दुपारी १.५० ते दुपारी ३.३५ दरम्यान तर रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी १३.०५ दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे लोकल व काही मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
या मेगा ब्लॉकमुळे आज शुक्रवारी बदलापूर ते खोपोलीदरम्यान लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. दुपारी १२.२० ची सीएसएमटी- खोपोली व दुपारी १.१९ सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकावर रद्द करण्यात आली आहे. तर १.४० सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापूर स्थानकावरच थांबवण्यात येणार आहे. तर दुपारी १.५५ कर्जत-सीएसएमटी आणि १.४८ खोपोली-सीएसएमटी लोकल अंबरनाथ स्थानकातून सोडली जाणार आहे. कर्जत येथून ३.२६ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल बदलापूर स्थानकावरून पुढे धावणार आहे.
तर रविवारी पळसधरी ते भिवपुरी रोड दरम्यान, अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा सकाळी ११.२० ते दुपारी १.०५ दरम्यान, बंद राहणार आहे. या ब्लॉक काळात नेरळ व खोपोली दरम्यान लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळी ९.२७ व ११.१४ची सीएसएमटी-कर्जत लोकल नेरळ स्थानकात थांबवली जाणार अही. तर सकाळी ११.१९ ते दुपारी १ दरम्यान सुटणाऱ्या लोकल नेरळ स्थानकातून सोडल्या जाणार आहेत. कोईम्बतूर- एलटीटी (११०१४) एक्सप्रेस ही लोणावळ्यात थांबवली जाणार आहे. तर पुणे-हजरत निजामुद्दीन (१२४९३ ) व चेन्नई- एलटीटी (१२१६४) ही गाडी पुणे विभागात थांबवली जाणार आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासाने केले आहे तसेच होणाऱ्या गैरसोईबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या