Anil Deshmukh : अनिल देशमुख पुन्हा अडचणीत? सीबीआयने दाखल केला गुन्हा, नवे प्रकरण काय?-cbi files one more fir against anil deshmukh what is new case devendra fadanvis ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anil Deshmukh : अनिल देशमुख पुन्हा अडचणीत? सीबीआयने दाखल केला गुन्हा, नवे प्रकरण काय?

Anil Deshmukh : अनिल देशमुख पुन्हा अडचणीत? सीबीआयने दाखल केला गुन्हा, नवे प्रकरण काय?

Sep 04, 2024 05:11 PM IST

anil deshmukh Vs Devendra Fadanvis : कथित १०० कोटी वसुली प्रकरणी चौकशी सुरूअसतानाच आता अनिल देशमुखांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

अनिल देशमुख यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
अनिल देशमुख यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.अनिल देशमुख१०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात सध्या जामीनावर बाहेर आहेत. पुन्हा नव्या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने देशमुखांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला आहे.कथित १०० कोटी वसुली प्रकरणी चौकशी सुरूअसतानाच आता अनिल देशमुखांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

कोणत्या प्रकरणात देशमुखांविरोधात गुन्हा?

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी भाजपचे गिरीश महाजन यांना अटक करण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे.

गुन्हा दाखल होताच देशमुखांचा फडणवीसांवर निशाणा -

गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुखांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देशमुखांनी म्हटले की, धन्यवाद... देवेंद्रजी फडणवीस, माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता, न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे.

महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे, ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे. आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे, असेही देशमुख म्हणाले.