मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शरद पवारांवरील आक्षेपार्ह facebook पोस्ट केतकी चितळेला भोवली, गुन्हा दाखल

शरद पवारांवरील आक्षेपार्ह facebook पोस्ट केतकी चितळेला भोवली, गुन्हा दाखल

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 14, 2022 09:59 AM IST

केतकी चितळे आणि वाद हे समीकरण तसं जुनं आहे. मात्र केतकी चितळेने नुकत्याच शरद पवारांवरील केलेल्या पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आता कळवा पोलीस ठाण्यात केतकी चितळेवर गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेत्री केतकी चितळे
अभिनेत्री केतकी चितळे (हिंदुस्तान टाइम्स)

अभिनेत्री केतकी चितळे हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात एक अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. केतकी चितळे हिच्या पोस्ट विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्षेप घेत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता ही पोस्ट केतकी चितळे हिला चांगलीच भोवणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे.मात्र ही पोस्ट आपली नसून नितिन भावे नावाच्या व्यक्तीने ही पोस्ट लिहिलेली आहे असं केतकी भावेचं म्हणणं आहे.

मात्र शरद पवारांवर इतक्या खालच्या थराला जाऊन केलेल्या टीकेमुळे केतकी चितळे हिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात कलम १५३ ओ आणि कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानं आता केतकी चितळे अडचणीत आलीय.

काय म्हटलंय कळवा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत?

केतकी चितळे हिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं गेलंय की, केतकी चितळे हिनं बदनामीकारक पोस्ट केल्यानं आमच्या पक्षातले नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. केतकी चितळे हिनं पोस्ट करुन जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम केलं आहे. सदर महिलेने आणखीनही पोस्ट केल्या असल्याची दाट शक्यता आहे असंही या तक्रारीत म्हटलं गेलंय.

<p>केतकी चितळेची हीच ती पोस्ट</p>
केतकी चितळेची हीच ती पोस्ट (हिंदुस्तान टाइम्स)

यापूर्वीही केतकी चितळेच्या पोस्ट या कायम वादात राहिलेल्या आहेत. अशात केतकी चितळेविरोधात शरद पवार यांच्याबद्दल खालच्या स्तरात लिखाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी महेश टिळेकर यांनीही केतकी चितळे हिला एका आक्षेपार्ह पोस्टचबद्दल चांगलंच सुनावलं होतं. मात्र केतकी चितळे हिच्या फेसबुक पोस्ट अद्यापही वादात राहिल्या आहेत. आगामी काळात केतकी चितळे हिच्यावर काय कारवाई होणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

WhatsApp channel