Pune Crime News Marathi : मध्य आशिया आणि आखाती देशांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून पुण्यातील महिलांची विदेशात विक्री करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातून विदेशात नेल्यानंतर तीन महिलांसह चार जणींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. याशिवाय आरोपींनी प्रत्येकी चार लाख रुपयांमध्ये महिलांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात दोन महिलांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी दलाली करणाऱ्या नसरीन भाभी, अब्दुल शेख, शमिमा खान आणि हकीम या आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या काही महिलांना आरोपी दलालांनी विदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. केवळ सफाई कामासाठी ४५ ते ५० हजार रुपयांची सॅलरी मिळणार असल्याचं आरोपींनी महिलांना सांगितलं. त्यानंतर आरोपींनी सात महिलांना सौदी अरेबियात नोकरीसाठी पाठवलं. त्याचवेळी आरोपींनी संबंधित सर्व महिलांची प्रत्येकी पाच लाख रुपयांत विक्री केली होती. त्यानंतर सौदी अरेबियातील एका व्यक्तीने पुण्यातील सर्व महिलांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. वेळेवर जेवण न देणं, रात्री काम करायला लावणं आणि आरोपींनी सांगितलेलं न ऐकल्यास महिलांना मारहाण केली जात होती.
विदेशातील छळाला कंटाळून पुण्यात परतण्यासाठी पीडित महिलांनी पुण्यातील दलालांना संपर्क साधला. त्यावेळी आरोपींनी चार लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर पाच लाख रुपयांत पुण्यातील विक्री करण्यात आल्याचं पीडित महिलांच्या लक्षात आलं. याशिवाय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणात तातडीने लक्ष घालत सौदीच्या दूतावासाशी चर्चा केली. त्यानंतर सर्व महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपींवर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या