मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Loan App च्या माध्यमातून मुंबईत तरुणाची बदनामी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Loan App च्या माध्यमातून मुंबईत तरुणाची बदनामी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 24, 2022 06:55 PM IST

मुंबईतील मालाड परिसरात लोन अॅपच्या माध्यमातून एका ग्राफिक डिझायनर तरुणाची अश्लील छायाचित्र प्रसारित करून बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून सायबर सेलही याचा तपास करत आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून लोन app बाबत अनेक तक्रारी दाखल होत आहेत. आता मुंबईतील मालाड परिसरात एक प्रकरण समोर आले आहे. त्यामध्ये कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या ॲपच्या माध्यमातून ग्राफिक डिझायनर तरुणाचे अश्लील छायाचित्र व्हायरल करून त्याची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याचा संमातर तपास सायबर सेलकडूनही करण्यात येत आहे. कुरार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह बदनामी करणे, शिवीगाळ करुन धमकी देणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालाड येथे राहणाऱ्या २८ वर्षीय ग्राफिक डिझायनर तरुणाला काही दिवसांपूर्वी त्याला पैशांची अडचण होते. त्यामुळे त्याने सोशल मीडियावरील ॲपवर कर्जाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याच्याकडे वैयक्तील माहिती तसेच फोटोही मागण्यात आले. त्यानंतर तात्काळ त्याचे कर्ज मंजूर करून त्याच्या बँक खात्यावर रक्कम हस्तांतरित केली. कालांतराने ती रक्कम त्याने व्याजासहीत परतही केली होती. त्यामुळे त्याला कंपनीवर विश्वास निर्माण झाला होता. २६ ऑक्टोंबरला त्याने पुन्हा कंपनीत १८ हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र त्याच्या खात्यात १० हजार ८०० रुपये जमा झाले होते. काही दिवसांनी त्याने ७ हजार २०० रुपये कंपनीला पाठवून दिले होते. २१ नोव्हेंबरला त्याला एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून कर्जाच्या परतफेडीसाठी शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्याला धमकीचे संदेश येऊ लागले. कर्जाची परतफेड केली नाही तर तुझे तंत्रज्ञानाद्वारे अश्लील छायाचित्र तयार करून परिचित व्यक्तींना पाठविण्याची धमकी त्याला दिली होती. त्यामुळे त्याने व्याजासहीत संपूर्ण रक्कम भरली. १० हजार ८०० रुपये घेतल्यानंतर त्याने २१ हजार ६०० रुपये जमा केले होते. तरीही त्याला आणखी पैसे भरण्यासाठी धमकी दिली जात होती.

या व्यक्तीने त्याची काही अश्लील छायाचित्रे त्याच्या ओळखीच्या व्यक्तींना पाठवून त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर त्याच्या परिचित व्यक्तीच्या मुलीचे अश्लील छायाचित्र तयार करून आरोपीने प्रसारित करून तक्रारदार तरूणाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे त्याने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. 

IPL_Entry_Point

विभाग