राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात राज्यात पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला आहे. पुणे शहर भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर शिर्डीतही आव्हांडाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे प्रभू रामाबाबत आव्हाड चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी राम शिकार करत होता तसेच मांसाहारही करत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशभरात वादंग उठल्यानंतर आव्हाड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र आज त्यांच्याविरोधात पुणे आणि शिर्डीत गुन्हे दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात आव्हाड यांनी आपल्या भाषणात प्रभू राम वनवासात शिकार करून मांसाहार करत होते, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं.
भाजपचेपुणे शहर जिल्हाध्यक्षधीरज घाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत,जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वादग्रस्त वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्याचा कार्यक्रम आहे,या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह वक्तव्य करून आव्हाड यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखविल्या आहेत. आक्षेपार्ह व प्रक्षोभक वक्तव्य करून जनतेच्या भावना दुखविल्याने आव्हाड यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे,असे घाटे यांनी म्हटलं आहे.