Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिसव महत्वाचा आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारनंतर राज्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीला पक्षांतर्गत बंडखोरांची चिंता लागली आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी दिवाळीत सर्व पक्षश्रेष्ठींनी या बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे बंडखोर आज उमेदवारी अर्ज माघारी घेणार का? की लढत देऊन दोन्ही आघाड्यांचे टेन्शन वाढवणार हे काही तासांत स्पष्ट होणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. २८८ जागासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या ७०६६ इतकी आहेत. यात बंडखोर उमेदवारांची संख्या जास्त आहे. महाविकास आघाडी व महायुतीतील प्रमुख पक्षात खरी लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांची मोठी संख्या होती. पक्ष प्रमुखांना प्रत्येकाला संधी देता न आल्याने अनेकांनी बंडाचे हत्यार उपसले. राज्यात बहुतांश मतदार संघात बंडखोरी झाली आहे. तर काही ठिकाणी युती-आघाडीतील मित्रपक्षांनीच एकमेकांविरोधात अर्ज दाखल केल्याने तिढा वाढला आहे. या उमेदवारांमुळे थेट निकालावर परिमाण होऊ शकतो. यामुळे दोन्ही आघाड्यांचे टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे बंडखोरांना विविध प्रलोभने दाखवून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विधानसभेसाठी आज दुपारी ३ पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. या विहित वेळेत उमेदवारांना त्यांना अर्ज मागे घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आज दुपारी ३ नंतर निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुका दुरंगी, तिरंगी किंवा बहुरंगी होणार याचा फैसला हा आज होणार आहे. त्यामुळे बंडखोरांना शांत करण्यासाठी काही वेळ दोन्ही आघाड्यांकडे राहिला आहे.
राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदार संघ म्हणजे माहीम मतदार संघ आहे. या मतदार संघातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात महायुतीतील सदा सरवणकर हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी त्यांच्यावर अनेकांनी दबाव आणला. मात्र, सरवणकर हे निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. भाजपने अमित ठाकरे यांना पाठिंबा घोषित केला आहे. अशा स्थितीत आज सरवणकर काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बोरिवली मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार संजय उपाध्याय यांनी अर्ज भरला आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. शेट्टी यांची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र, गोपाळ शेट्टी यांनी त्यांची भूमिका अद्याप जाहीर केली नाही. त्यामुळे आज ते अर्ज माघारी घेणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक यांच्याविरोधात महायुतीतील शिवसेनेकडून सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपने मलिक यांचा प्रचार करण्यास थेट नकार दिला आहे. तर शिवसेनेकडून सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात विद्यमान आमदार अबू आझमी, नवाब मलिक व सुरेश पाटील यांच्यात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.