Narayan Rane : नारायण राणेंची खासदार म्हणून झालेली निवड रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narayan Rane : नारायण राणेंची खासदार म्हणून झालेली निवड रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी

Narayan Rane : नारायण राणेंची खासदार म्हणून झालेली निवड रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी

Jun 19, 2024 06:56 PM IST

Narayan Rane News : कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार नारायण राणे यांची खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी अशी मागणी शिवसेना (उबाठा)चे माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

BJP MP Narayan Rane elected from Sindhudurg-Ratnagiri Lok Sabha constituency
BJP MP Narayan Rane elected from Sindhudurg-Ratnagiri Lok Sabha constituency (Hindustan Times)

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला असून राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष निवडणूक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी घालण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उबाठा)चे माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. राऊत यांनी याबाबत निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटिस पाठवली आहे. राऊत यांनी अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक व अ‍ॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत ही नोटिस पाठवली आहे.

लोकसभेचा निवडणुक प्रचार कालावधी ५ मे २०२४ रोजी संपलेला असतांनाही सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात भाजप कार्यकर्ते ६ मे २०२४ रोजी सुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करीत होते, तसेच मतदारांना ईव्हीएम मशीन दाखवून 'राणे साहेबांनाच मत द्या' असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

नारायण राणे यांचे पुत्र भाजप आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले की, 'जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याकडे निधी मागायला यायचे नाही. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधीसुद्धा मिळणार नाही, अशी धमकी १३ एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली असल्याचा उल्लेखही नोटिशीमध्ये करण्यात आला आहे. 

नारायण राणे, नीतेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी केला निवडणूक आचार संहितेचा भंग

नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याचा आरोप या नोटिशीत करण्यात आला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी विनंती शिवसेना (उबाठा)चे माजी खासदार विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिशीमधून केलेली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने येत्या ७ दिवसात या नोटिसवर उत्तर द्यावे, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल असे माजी खासदार राऊत यांनी म्हटले आहे.

अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या मदतीने करण्यात आले आहेत, हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत. त्याबाबत नागरिक म्हणून देशावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिति असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे म्हटले आहे.

Whats_app_banner