मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathwada Cabinet Meeting : दुष्काळाच्या सावटाखाली आज कॅबिनेट बैठक; मराठवाड्याला काय मिळणार?

Marathwada Cabinet Meeting : दुष्काळाच्या सावटाखाली आज कॅबिनेट बैठक; मराठवाड्याला काय मिळणार?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 16, 2023 08:10 AM IST

Marathwada Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Marathwada Cabinet Meeting
Marathwada Cabinet Meeting (HT)

Marathwada Cabinet Meeting : मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झालेली असतानाच शिंदे-फडणवीस सरकार मराठवाड्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री संभाजीनगरमध्ये आलेले आहे. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर देखील कॅबिनेट बैठकीत चर्चा केली जाणार असून या विषयावर तोडगा काढण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री शिंदे लक्ष घालणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मराठवाड्यात पाणीप्रश्न गंभीर-

मराठवाड्यातील आष्टी, पाटोदा, अहमदपूर, जळकोट, कन्नड, गंगापूर, खुलताबाद, जालना, माजलगाव आणि धारूर या तालुक्यांमध्ये पाणीप्रश्न भीषण झालेला आहे. याशिवाय अंबड, गंगाखेड, वसमत, औसा, शिरूर, अनंतपाळ, रेणापूर, उस्मानाबाद, नळदुर्ग बीड, जाफराबाद, उमरगा आणि लोहारा या तालुक्यांमध्ये रस्ते तसेच अन्य सुविधांची प्रचंड वानवा आहे. त्यामुळं आता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील स्थितीचा आढावा घेण्यात आला असून मंत्रिमंडळ बैठकीत यावर अनेक निर्णय घेण्यात येणार आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतल्या ३४ नगरपालिका क्षेत्रांमध्ये एका वर्षापासून तब्बल चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळं लोकांना पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी मिळणं कठिण झालं आहे. याशिवाय पावसाने दडी मारल्याने शेतीपिकांची दुरावस्था झालेली आहे. हातची पीकं वाया गेल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. त्यामुळंच आता मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्तानं शिंदे-फडणवीस सरकार संभाजीनगरमध्ये दाखल झालं असून बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात, शेतकरी प्रश्न, पाणी प्रश्न, रस्त्यांची अवस्था, स्मार्ट सिटी आणि आरोग्यव्यवस्था अशा अनेक प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारकडून निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

WhatsApp channel