Mumbai news : वरळी सी लिंक वरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी मध्यरात्री अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मुंबईत एका कॅब चालकाने वरळी सी लिंकवर कॅब थांबवून समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. या बाबत माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्री अंधार आणि समुद्राच्या उंच लाटांमुळे मृतदेह सापडला नाही. आज सकाळी ७.३० च्या सुमारास त्याच्या मृतदेह दादर येथे सापडला. त्याचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आला, ऑनलाइन गेमिंगच्या नादातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्ताफ मोहम्मद हुसेन असे या कॅबचालकाचे नाव आहे. तो गोवंडीचा रहिवासी आहे. तर त्याच मूळ गाव उत्तर प्रदेशातील आहे. तो गोवंडीत रूममेट्ससोबत राहत होता. हुसैनच्या नातेवाईकाने पोलिसांना सांगितले की, त्याला ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन होते.
अल्ताफने शुक्रवारी पहाटे १ वाजता वरळीच्या मोबाईल पोलिस व्हॅनला पोल क्रमांक ८३ आणि ८४ दरम्यान मदतीसाठी कॉल आला. वरळी सी लिंक वरून एकाने समुद्रात उडी मारल्याचे कळले. वरळी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करून बॅटरीच्या सहाय्याने पाण्यात उडी मारलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अंधार आणि भरती-ओहोटीमुळे त्याचा मृतदेह सापडला नाही.
हुसेनचा मृतदेह शुक्रवारी सकाळी दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याच्या चुलत भावाने मृतदेहावर दावा केल्याचे पोलिसांनी सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, "हुसेनच्या नातेवाईकांना मृतदेह त्यांच्या मूळ गावी न्यायचा आहे. आम्ही जबाब नोंदवण्याच्या प्रक्रियेत आहोत. अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हुसैन ऑनलाइन गेमिंग ॲप्सचा वापर करत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले असून त्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाल्याचा संशय आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आमची टीम नेमके कारण शोधण्यासाठी तपास करत आहे.
पोलिसांच्या पथकाने कॅबची तपासणी केली. त्यादरम्यान त्यांना हुसेनचा मोबाईल फोन व कॅबची कागदपत्रे सापडली. “त्याचा फोन लॉक नव्हता त्यामुळे पोलिसांना त्याच्या भावाचा नंबर मिळाला. त्यानंतर त्याची ओळख पटली.