Thane Bus Fire: ठाणे महापालिका परिवहनच्या बसला मंगळवारी (१७ सप्टेंबर २०२४) सायंकाळी आग लागल्याची घटना उघडकीस आली. या बसमध्ये एकूण ९० प्रवाशी होते. बस चालक आणि वाहकाने तात्काळ कारवाई करत सर्वांना सुखरूप बाहेर काढले. बस चेंदणी कोळीवाड्याहून खिडकलेश्वर मंदिराकडे जात होती. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी ही माहिती दिली. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार,चेंदणी कोळीवाड्याहून खिडकलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या बसच्या मागील इंजिनच्या डब्याला आग लागली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक अग्निशमन दलाचे जवान आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने थोड्याच वेळात आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे तडवी यांनी सांगितले. टीएमसीपरिवहन व्यवस्थापक बाळचंद्र बेहरे यांनी सांगितले की, बसची आसन क्षमता ४२ आहे आणि सुमारे २० प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात. परंतु, अनंत चतुर्थीनिमित्त अनेक लोक घराबाहेर पडल्याने बसमध्ये गर्दी झाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही, अशीही माहिती समोर येत आहे.
ठाण्याती काही दिवसांपूर्वी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली होती. मुंबईहून मेगाठाणे ते ठाणे स्थानकाकडे जात असताना कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पायना वाईन शॉपजवळ या बसला आग लागली. बसचे टायर लाइनर जास्त तापल्याने आग लागली अशी प्राथमिक माहिती समोर आली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये ६० पेक्षा जास्त प्रवासी होते.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच जवानांन ताबडतोब सतर्क करण्यात आले आणि दोन्ही वाहतूक पोलिस अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. बस चालक आणि वाहक, अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणून संभाव्य अनर्थ टळला. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या म्हणण्यानुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. टायर तापल्याने बसमध्ये आग लागल्याचे बोलले जात आहे. परंतु, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.