अक्षय अर्जुन बैत (वय २२) असे १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या चोरट्याचे नाव आहे. बैत हा अनेक गुन्ह्यांत सहभागी होता. विक्रोळी तील एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर चोरी करण्यासाठी गेलेल्या अक्षय बैत या चोरट्याचा तोल गेला.
अक्षय बैत हा अट्टल आरोपी आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर व त्याच्या साथीदारांवर एका व्यक्तीला पैसे न दिल्याने निर्वस्त्र करून मारहाण केल्याचा गुन्हा नुकताच पार्क साईट पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. कसारा येथे नुकत्याच घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातही बैत हवा होता, अशी माहिती पार्क साइट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर परिसरातील मधुकुंज सोसायटीतील सुरक्षा रक्षकाला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी या व्यक्तीची ओळख पटवल्यावर तो अक्षय अर्जुन बैत असल्याचे उघड झाले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता, अक्षय चोरीच्या उद्देशाने रात्री दीडच्या सुमारास इमारतीत गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याने ओळख लपवण्यासाठी चेहऱ्याने त्याचा चेहरा बांधला होता. तो १४ व्या मजल्यावर गेला, पण याच वेळी त्याचा तोल गेला आणि तो १४ व्या मजल्यावरून जमिनीवर पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला, आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत, अशी माहिती विक्रोळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर हिरडेकर यांनी दिली.
अक्षय हा या भागात अनेक गुन्ह्यांसाठी कुख्यात होता. घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्याच्या वडिलांचा जबाब नोंदवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.