जम्मू-काश्मीरमध्येही चालणार बुलडोझर पॅटर्न! दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत उपराज्यपाल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जम्मू-काश्मीरमध्येही चालणार बुलडोझर पॅटर्न! दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत उपराज्यपाल

जम्मू-काश्मीरमध्येही चालणार बुलडोझर पॅटर्न! दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत उपराज्यपाल

Nov 06, 2024 10:25 AM IST

bulldozer action in jammu and kashmir : उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना उपराज्यपाल म्हणाले की, जर कोणी दहशतवाद्यांना आश्रय दिला तर त्याचे घर जमीनदोस्त केलं जाईल.

जम्मू-काश्मीरमध्येही चालणार बुलडोझर पॅटर्न! दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत उपराज्यपाल
जम्मू-काश्मीरमध्येही चालणार बुलडोझर पॅटर्न! दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत उपराज्यपाल (Office of LG J&K-X)

bulldozer action in jammu and kashmir : उत्तर प्रदेश प्रामाणे आता जम्मू काश्मीरमध्येही बुलडोजर पॅटर्न राबवला जाणार आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची घरे थेट जमीनदोस्त केली जातील, असा इशारा जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिला आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात जनतेने एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. जर सुरक्षा दल, केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि लोक एकत्र आले तर वर्षभरात या भागातून दहशतवाचा नायनाट होऊ शकतो असे देखील ते म्हणाले.

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना उपराज्यपाल म्हणाले की, मी सुरक्षा दलांना निर्देश दिले आहेत की त्यांनी कोणत्याही निरपराध व्यक्तीला इजा पोहोचवू नये, परंतु दोषींना सोडले जाणार नाही. जर कोणी दहशतवाद्यांना आश्रय दिला तर त्याचे घर जमीनदोस्त केले जाईल. याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. 

सिन्हा म्हणाले की, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांवर अत्याचार होत असल्याची ओरड काहीलोक करत आहेत. मात्र, हा अत्याचार नसून न्याय आहे आणि हा न्याय असाच सुरूच राहील, असे देखील सिन्हा म्हणाले.

 शेजारी राष्ट्र जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याची आम्हाला चिंता नाही, तर इथले लोक त्यांच्या सूचनेनुसार येथील शांतता भंग करत आहे हा खरा चिंतेचा विषय आहे. अशा लोकांची ओळख पटवणं हे केवळ सुरक्षा दल आणि प्रशासनाचं काम नाही, तर लोकांचंही काम आहे. लोक दहशतवाद्यांना आश्रय देत असतील आणि मग आम्ही त्यांच्यावर अन्याय करत आहोत, असे म्हणत असतील तर ते योग्य नाही.

जम्मू-काश्मीरच्या जनतेने दहशतवादाविरोधात उभे राहावे, असे आवाहन करत सिन्हा यांनी या भागात दळणवळणाच्या सोई आणि विकासकामे करण्यासाठी काम करणाऱ्यांना ठार मारण्याचा अधिकार कोणाला आहे का, असा सवाल उपस्थितांना केला. गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात बोगद्याच्या बांधकामाच्या ठिकाणी २० ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांनी स्थानिक डॉक्टर आणि सहा स्थलांतरित मजुरांची हत्या केली होती, या घटनेचा सिन्हा यांनी निषेध केला. 

जर लोक अशा घटकांच्या विरोधात उभे राहिले नाहीत, तर ही परिस्थिती कधीच बदलणार नाही. केवळ औपचारिकतेसाठी विधाने करणारे त्यांच्यापेक्षा (दहशतवाद्यांपेक्षा) वाईट आहेत, असे मला वाटते. खोऱ्यात दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये वाढ होत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर