बुलढाणा : सध्या रब्बी हंगामातील गळू मळणी सुरू आहे. आधुनिक यंत्रांद्वारे गव्हाची मळणी आणि सफाई केली जाते. सध्या शेतकरी या कामात व्यस्त आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथे यंत्राच्या साह्याने गव्हू साफ करत असतांना गळ्यातील रुमाल मशीनमध्ये अडकल्याने एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला.
शांताबाई शेवाळे (वय ३५) असे मशीनमध्ये रुमाल अडकून मृत्यू झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे. शेतकरी तुळशीराम शेवाळे, शांताबाई शेवाळे, आणि त्यांचा मुलगा हे त्यांच्या शेतात गहू स्वच्छ करण्याच्या फिल्टर मशीनवर काम करत होते. यावेळी गहू स्वच्छ करत असताना शांताबाई शेवाळे यांच्या गळ्यात रुमाल गुंडाळला होता. हा रुमाल अचानक मशीनमध्ये ओढला गेला. यामुळे शांताबाई शेवाळे यांच्या गळ्याला फास बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सिंदखेडराजा शहरावर शोककळा पसरली आहे.
रब्बी हंगामातील शेतात नवीन गहू बाजारात आणण्याची गडबड सुरू आहे. याच कामात शेतकरी व्यस्त आहे. गहू साफ करण्यासाठी यंत्राचा वापर केला जात आहे. या यंत्रावर काम करतांना काळजी घेणे गरजेचे आहे. यंत्रांद्वारे गव्हाची मळणी करत असतांना अंगावरील कपडे व्यवस्थित बांधावे, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.