Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३०४ येथे एका कारचा अपघात झाला असून यात तिघे जण ठार झाले आहेत. या अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे. या घटनेत कारचा चक्काचूर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. या महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून अनेक अपघात या ठिकाणी झाले आहेत.
लताबाई पुरुषोत्तम मेहेर, मुकेश अनुज राम मेहेर, अत्मजा मुनोरबोद अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर आज एका भरधाव कारचा अपघात झाला. मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३०४ जवळ ही घटना घडली. ही गाडी वेगात असतांना दुसऱ्या एका वाहनाने या गाडीला धडक दिली.
या अपघातात कार मधील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. या अपघात ठार झालेले नागरिक हे छत्तीसगडमधील रहिवासी आहेत. या घटनेत एका व्यक्तीचा जागेवरच तर दोघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. फरार वाहनचालकांचा पोलिस तपास घेत आहेत.
समृद्धी महामार्गावरील गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरच आहे. एकामागोमाग एक होणारे अपघात पाहता या मार्गावरून प्रवास करतांना प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका ही अद्याप थांबलेली नाही. येथील अपघात कमी करण्यासाठी सरकारने अनेक उपाय केले. या मार्गाची पाहणी केली. तसेच अनेक उपाय योजना देखील केल्या. मात्र, तरी सुद्धा अपघात सुरच असल्याने या मार्गावरून प्रवास करायचा की नाही? असा प्रश्न आता वाहनचलकांना पडत आहे. या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.