मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldhana news: साडीच्या पदराने केला घात! बुलढाण्यात मळणी यंत्रात पदर अडकून महिलेचा मृत्यू

Buldhana news: साडीच्या पदराने केला घात! बुलढाण्यात मळणी यंत्रात पदर अडकून महिलेचा मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 01, 2023 12:24 PM IST

Buldhana news : बुलढाणा येथे शेतात हरभरा मळणी सुरू असतांना साडीचा पदर अडकल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.

Crime
Crime

बुलढाणा: सध्या शेतीकामाची लगबग सुरू आहे. पिकांची मळणी करण्याच्या कामात शेतकरी आहे. दरम्यान, बुलढाणा येथे हरभरा मळणीचे काम सुरू असतांना एका महिलेच्या साडीचा पदर मळणी यंत्रात अडकल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुलढाणा येथील शिंदी येथून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथे एका शेतात घडली.

तारामती गुलाबराव बुंदे (वय ४०) असे या अपघात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांदुळ येथील गुलाबराव बुंधे यांच्याकडे ३ एकर शेती आहे. त्यांनी रब्बी हंगामात हरभरा पेरणी केली होती. त्यांच्या शेतातील हरभरा सोंगून झाला होता. गावातीलच परस राम बुंधे यांचे मळणी यंत्र बोलावून हरभरा काढणीला सुरुवात केली होती. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याने बुंदे यांच्या शेतात हरभरा काढण्यासाठी लगबग सुरु होती.

गुलाबराव आणि तारामती हे दोघेही पती-पत्नी शेतातील हरभरा जमा करून मळणी यंत्रात टाकत होते. दरम्यान, यावेळी ढगाळ हवामान होते. वाराही वेगाने वाहत असतांना तारामती बुंदे यांच्या साडीचा पदर हरभरा मळणी यंत्रात अडकला. यामुळे त्या आतमध्ये ओढल्या गेल्या. यात त्यांच्या बरगड्यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना स्थानिकांना समजताच नागरिक जमा झाले. त्यांनी तातडीने त्यांना दवाखान्यात नेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. मृतकाच्या मागे पती एक मुलगा दोन विवाहित मुली असा परिवार आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतातील पिकांची कापणी सुरु असून हा माल बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. यामुळे पिकांची मळणी करत असतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग